अहमदनगर - मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेला रमझानचा महिना जवळ येत आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊनचे नियम पाळूनच या पवित्र महिन्यातील आजान, सहेरी, इफ्तार या गोष्टींचे पालन करावे लागणार आहे. या अनुषंगाने मंगळवारी मुस्लीम समाजाच्या प्रतिनिधींनी पोलीस-प्रशासनाची भेट घेतली.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू असतानाच मुस्लीम समाजाचा पवित्र रमजामचा महिनाही जवळ आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस-प्रशासन आणि मुस्लीम बांधवांत समन्वय रहावा यासाठी ही बैठक झाल्याचे सांगण्यात आले आहे. या वेळी विविध बाबींवर चर्चा झाली. पोलीस मुख्यालयातील पोलीस लॉन्स हॉलमध्ये जिल्ह्यातील मुस्लीम समाजाचे उलेमा, मौलवी, विश्वस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी मुस्लीम समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाला रोखण्यासाठी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर आवश्यक खबरदारी घेणे, हे सर्वांचे कर्तव्य आहे. पवित्र रमजान महिन्यातही सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन सिंह यांनी मुस्लिम बांधवांना केले.
बैठकीस उपस्थित मुस्लिम प्रतिनिधींनी कोरोना संकटाची जाणीव समाजास असून नियम पाळले जातील असे प्रशासनास आश्वस्त केले. नमाज घरातूनच अदा केली जाईल. मात्र, समाजातील जनतेला सेहरी, इफ्तारची रोजची माहिती व्हावी, यासाठी अजाणची परवानगी मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कोरोनाचे संकट अवघ्या मनुष्य जातीवर आलेले संकट आहे. या संकटाला तोंड देताना मुस्लिम समाज मागे राहणार नाही. देशात लॉकडाऊन असताना नियम पाळूनच पवित्र रमजानचे रितिरिवाज केले जातील अशी ग्वाही यावेळी मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी दिली.