अहमदनगर - कोरोना झालेल्या किंवा होऊन गेलेल्या अनेक रुग्णांत म्युकरमायकोसिस हा आजार होताना दिसून येत आहे. काहीसा गंभीर परिणाम होऊन प्रसंगी मृत्यू होण्याचे प्रमाण या आजारात दिसून येत असल्याने त्याबद्दल सध्या घबराटीचे वातावरण आहे. मात्र प्राथमिक लक्षणे दिसताच तपासणी आणि योग्य उपचार केल्यास रुग्णांच्या जीवाला धोका अगदी कमी असतो, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसल्याची माहिती म्युकरमायकोसिसवर विविध उपचार आणि शस्त्रक्रिया करणारे अहमदनगर येथील गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर संजय असनानी यांनी दिली आहे.
पोस्ट कोविडमध्ये म्युकरमायकोसिस कुणालाही होऊ शकतो -
सध्या अनेक कोरोना रुग्णांची अवस्था म्युकरमायकोसिस या आजाराने गहाळ करून ठेवली आहे. एक तर हा आजार खर्चिक आहे त्यात या आजारावरील इंजेक्शनचा तुटवडा आणि अनेक व्याधी निर्माण होऊन मृत्यूची भीती असल्याने कोरोना बाधित असलेले किंवा कोरोना होऊन गेलेल्या रुग्णात या आजाराबद्दल भीतीचे वातावरण आहे. मधुमेही रुग्णांबरोबरच इतर कसलेही आजार नसलेल्या कोरोना रुग्णांतही म्युकरमायकोसिस आजार होत असल्याचे पुढे येत आहे. एकट्या नगर जिल्ह्यात आतापर्यंत तीन रुग्णांचा जीव या म्युकरमायकोसिसने घेतला आहे. तर सध्या 70 रुग्णांवर शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या आजाराबद्दल भीती असली तरी या आजाराची प्राथमिक लक्षणे दिसताच तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि उपचार घेतल्यास रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो अशी माहिती डॉक्टर संजय असनानी यांनी दिली आहे.
आता म्युकरमायकोसिस इंजेक्शनचाही काळाबाजार -
म्युकरमायकोसिस आजारावर उपचार असले तरी सध्या औषधांचा तुटवडा आहे. त्यात म्युकरमायकोसिसवर लागणारे इंजेक्शन मिळण्यास अडचणी येत असून त्यामुळे या इंजेक्शनचा काही ठिकाणी काळाबाजार होऊ लागला आहे. एका दिवसाला एका रुग्णाला चार इंजेक्शनची गरज असल्याची माहिती डॉ. असनानी यांनी दिली आहे. इंजेक्शनचा खर्च हा महागडा आहे. यामध्ये स्वस्तातील इंजेक्शन्स उपलब्ध असले तरी त्याचे गंभीर साईड-इफेक्ट असल्याचे डॉक्टर असणानी यांनी सांगितले आहे. राज्य शासनाने एक परिपत्रक काढून ही इंजेक्शन्स जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्हा रुग्णालयाकडे पाठवून त्याचे वाटप केले जाणार असल्याने इंजेक्शनचा काळाबाजार थांबून त्याचे योग्य वाटप होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
ऑक्सिजनचा विनाकारण आग्रह धरू नये -
मधुमेही रुग्णांबरोबरच जास्त दिवस ऑक्सिजन लावलेला रुग्ण म्युकरमायकोसिसमुळे बाधित होत आहेत. त्यामुळे रुग्ण किंवा नातेवाईकांनी गरज नसताना ऑक्सिजनचा आग्रह धरू नये असा सल्ला नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. कोरोनाचे नवनवे स्ट्रेन पुढे येत आहेत. त्यात रुग्ण अधिक गंभीर होत आहेत. त्यातूनही बरे झाल्यानंतर इतर नवीन आजार होण्याची शक्यता असल्याने कोरोना होऊच नये म्हणून अधिक काळजी घेणे, त्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करणे, लसीकरण जलद गतीने होणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे.
हेही वाचा - आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही लस द्या.! ठाण्यातील तृतीयपंथीयांची मागणी