अहमदनगर - जिल्ह्यातील कोपर्डी गावात ३ वर्षांपूर्वी एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला तीन वर्षे उलटूनही आरोपींना अजून फाशीची शिक्षा झालेली नाही. त्यामुळे पिडीतेला न्याय मिळाला नसल्याने, १३ जुलैला कोपर्डीत मुलीच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकात तिला श्रद्धांजली अर्पण करतेवेळी आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी पिडीतेच्या आईने केली आहे.
जिल्ह्यातील कोपर्डी या छोट्याशा गावात १३ जुलै २०१६ या दिवशी काळीमा फासणारी घटना घडली. एका १४ वर्षीय मुलीवर ३ नराधमांनी बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. शनिवारी या घटनेला ३ वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, अद्यापही मुलीच्या कुंटुंबाला न्याय मिळालेला नाही. या निर्भयावर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करणाऱ्या नराधमांना तातडीने फाशी द्या, अशी आर्त मागणी निर्भयाच्या आईने शनिवारी केली. घटनेला तीन वर्षे पूर्ण होत असताना कोपर्डीत तिच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकात नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली. पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.