अहमदनगर - गेल्या ७ दिवसांपासून कला केंद्राविरोधात सूरु असलेले जामखेड तालुक्यातील मोहा ग्रामस्थांपुढे जिल्हा प्रशासन नमले आहे. प्रशासनाने या कला केंद्रांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहा ग्रामस्थांच्या एकजुटीचा हा विजय आहे. सातव्या दिवशी या एकजुटीपुढे प्रशासनाला नमते घेणे भाग पडले.
जामखेड तालुका कला केंद्रासाठी प्रसिद्ध मानला जातो. शहरात तसेच बीड रोडवर मोहा गाव आणि परिसरात अनेक कलाकेंद्रांचे बस्थान आहे. मात्र गेल्या ३ महिन्यांपूर्वी मोहा येथील ग्रामस्थांनी कलाकेंद्रामुळे स्थानिक सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचा आरोप करत मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने गावातील सर्व कला केंद्रांचे परवाने नुतनीकरण न करता रद्द केले होते. मात्र काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने मोहा गाव-परिसरातील तब्बल ७ कला केंद्रांना पुन्हा परवानगी दिल्याने ग्रामस्थामध्ये संतापाची लाट उसळली.
जामखेड तालुका हा पालकमंत्री राम शिंदे यांचा मतदार संघ असल्याने त्यांच्यावर आरोप होऊ लागले. ग्रामस्थांनी प्रशासनाला विनंती केल्यानंतरही परवाने रद्द होणार नाही, अशी भूमिका प्रशासनाची असल्याने ग्रामस्थांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते. काल उपोषणाच्या सहाव्या दिवशी अनेक उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, दरम्यान तणावाची परस्थिती निर्माण झाली होती. कोणत्याही परस्थितीत जोपर्यंत कला केंद्रांचे परवाने रद्द होत नाहीत, तोंपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. तर गावातील सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवून विद्यार्थी आंदोलनस्थळी ठिय्या देऊन बसले होते. अखेर आज जिल्हा प्रशासनाने पुढील चौकशी होईपर्यंत कला केंद्रांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने उपोषणकर्त्या आंदोलकांनी लिंबू-पाणी पिऊन उपोषण सोडले. यावेळी ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला.