अहमदनगर - सोमवारी रात्री साईबाबांची शेजारती झाल्यानंतर अकरा वाजता मंदिर परिसरात एनएसजी कमांडोंच्या पथकाने चार तास मॉक ड्रिल केले. यामध्ये दहशतवादी हल्ल्यावेळी कशा प्रकारे कारवाई करावी, यासाठी प्रात्यक्षिक करण्यात आले. शिर्डीच्या साईबाबा मंदिराला असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन सरावाच्या उद्देशाने हे प्रात्यक्षिक करण्यात आले. मॉक ड्रिलदरम्यान सात दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची कारवाई करण्यात आली.
रात्री अकरानंतर मंदिर परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. येथे विविध भागात दहशतवादी लपल्याचे प्रसंग तयार करण्यात आला होता. त्यांच्या विरोधात कारवाई सुरु करण्यात आली. मंदिर परीसरात एनएसजीच्या कमांडोंनी अत्याधुनिक हत्यारांसह अंधारात लपलेल्या सात दहशतवाद्यांचे शोधकार्य सुरू केले. यावेळी दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या काही जणांची सुटकाही करण्यात आली. काहींच्या अंगावर लावण्यात आलेली स्फोटके एनएसजीच्या बॉम्बविरोधी पथकाने निष्क्रिय केली. या परिसरात लपलेल्या सात दहशतवाद्यांना कंठस्नान घालत कार्यवाही फत्ते केली.