अहमदनगर - काही दिवसांपूर्वी हॉटस्पॉट ठरलेला कर्जत-जामखेड तालुका आता कोरोनामुक्त झाला आहे. कदाचित यामुळेच की काय कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे सध्या कोरोना काळात सुध्दा दिलखुलास आहेत. मतदारसंघातील राशीन येथे आमदार रोहित पवार यांनी युवकांबरोबर शनिवारी (दि. 20 जून) रोजी क्रिकेट खेळत कसलेल्या फलंदाजासारखा षटकार मारून सर्वानाच आश्चर्य चकित केले.
आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड तालुक्यातील विविध गावात पाहणी दौरा केला. त्यावेळी राशीन येथील कुकडी कॉलनीत इंदिरानगर येथील काही युवक गल्लीक्रिकेट खेळत होते. त्यावेळी आमदार रोहित पवार गाव पाहणी करण्यासाठी तेथे गेले असता, त्यांनाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी बॅट्समनच्या हातातली बॅट घेऊन पोझ घेतली, वेगवान बॉलरने बॉल टाकला अन आमदार पवार यांनी पुढे सरसावत षटकार खेचला. त्यांचा हा षटकार पाहून उपस्थित काही क्षणासाठी आवाक झाले.
या नंतर त्यांनी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यासह टाकळी खंडेश्वरी या गावाला भेट दिली. या गावात आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीने पाऊल ठेवले नव्हते. त्यामुळे पवार या गावात येणार म्हटल्यावर अवघे गाव त्यांची वाट पाहत होते. या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी स्थानिक समस्या जाणून घेतल्या. यानंतर गावातून निघताना त्यांना एक रिक्षा दिसली आणि पवारांना रिक्षा चालवण्याची इच्छा झाली. रिक्षा चालकाकडून किल्ली घेत त्यांनी स्वतः स्टार्टर मारला आणि रिक्षाचे स्टेअरींग धरून सुसाट रिक्षा चालवू लागले. त्यांच्या या साधेपणाचे कौतूक गावात होत आहे.
सोशल डिस्टन्सिंगचा विसर-
पण, यावेळी त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठरवून दिलेले सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा विसर पडला. रिक्षातही अनेकांना बसवत त्यांनी फेरफटका मारला. क्रिकेट खेळतानाही मास्कचा वापर केला नव्हता. मतदार संघ कोरोनामुक्त झाला. पण, कोरोना अजूनही या जगातून मुक्त झालेला नाही, ही बाब लक्षात घेणे महत्वाची आहे, अशा चर्चाही काही लोकांमध्ये होत होत्या.
हेही वाचा - सदोष बियाणे प्रकरणी पंचनामे करून दोषींवर कारवाई करा - अजित नवले