अहमदनगर - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर केंद्रीय आयकर विभागाने छापे टाकून कारवाई आणि तपासणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे पुतणे आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, जिल्हा परिषदेचे काल लागलेले निकाल हे महाविकास आघाडीच्या बाजूने आल्याने लगेच ही कारवाई होत असेल तर त्यामागे राजकीय कारण असल्याचा संबंध असू शकतो, असे म्हटले आहे. अशा राजकीय कारवायांना जनताच आता वैतागली आहे, असेही ते म्हणाले.
भगवा ध्वजयात्रा चौंडीत दाखल
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी इथे त्यांनी याविषयावर भाष्य केले आहे. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून भगवा स्वराज्य यात्रेचा प्रवास अंतिम टप्प्यात असून स्वराज्य ध्वज यात्रा अहमदनगर जिल्ह्यात पोहोचली आहे. आज गुरुवारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी चौंडी इथे ध्वज यात्रा आल्यानंतर आ. पवार यांनी या पावनस्थळी दर्शन घेतले.
काय आहे भगवा ध्वज यात्रा?
कर्जत जामखेड येथील खर्डा किल्ल्याजवळ स्वराज्याची शेवटची लढाई झाली होती. यातूनच प्रेरणा घेऊन स्वराज्य ध्वज संकल्पना निर्माण झाली. संपूर्ण देशामध्ये या संकल्पनेचे मोठ्या जोरात स्वागत करण्यात आले आहे. कर्जत येथे जाऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वराज्य ध्वज फडकवला जाणार आहे. या ध्वजाचे वजन 90 किलो इतके आहे. यामुळे अठरा पगड जातींना न्याय देण्याचे काम होणार असल्याचे रोहित पवार म्हणाले.