अहमदनगर - भारतीय जनता पक्षाच्या ४० वा स्थापना दिवस कोणताही कार्यक्रम आयोजित न करता साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आगामी काही दिवस या आपत्तीचा सामना करणाऱ्या समाजघटकांच्या मदतीसाठी काम करा,वे असे आवाहन माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
हेही वाचा... कोरोनासाठी युद्धपातळीवर तयारी करा; पंतप्रधानांचे मंत्रिमंडळाला आदेश..
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेल्या आवाहनानूसार आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या निवासस्थानी पक्षाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. तसेच घरावर पक्षाचा झेंडा फडकवला. संपूर्ण जगाला शांतता आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महाविरांच्या प्रतिमेचे पूजन करून विखे पाटील यांनी जयंतीदिनी अभिवादन केले.
पक्षाच्या चाळीसाव्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने विखे पाटील यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पत्रकाद्वारे यापुढील काही दिवस कोरोनाच्या संकटाशी सामना करत असलेल्या समाजघटकांसाठी काम करण्याचा संकल्प करण्याचे सूचित केले. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काम करण्याचे आवाहनही विखे पाटील यांनी केले.
'कोरोना'सारख्या राष्ट्रीय संकटातून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेच. मात्र, ही लढाई यशस्वी करण्यासाठी आगामी काही दिवस कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. असे स्पष्ट करून विखे पाटील म्हणाले की, कोरोनाच्या संकटाशी सामना करणारे समाजघटक मोठ्या संख्येने असल्याने पुढील एक आठवडा अशा व्यक्ती आणि कुटुंबियांसाठी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काम करावे.
कोरोनाच्या राष्ट्रीय संकटात सरकारी कर्मचारी पोलीस, डाॅक्टर व नर्स, बँक तसेच पोस्ट कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सफाई कर्मचारी यांचे योगदान खूप मोठे असल्याकडे लक्ष वेधून, या सर्वांना कृतज्ञता पत्र देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या बुथमधील चाळीस कुटुंबियांशी संवाद साधून ही पाच कृतज्ञता पत्र संकलीत करून या व्यक्तींपर्यत पोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वतःची सुरक्षिता संभाळून काम करावे, असे विखे पाटील म्हणाले.