अहमदनगर - नगर तालुक्यातील निंबळक येथील स्वस्तधान्य दुकानातून शासनाने ठरवून दिल्यापेक्षा कमी धान्य मिळत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. त्याची दखल घेत पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी सदर दुकानास अचानक भेट देऊन स्वस्त धान्य दुकानदाराचा चांगलाच समाचार घेतला.
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्याकडे अनेक लाभार्थी यांनी तक्रारी केल्या होत्या. स्वस्तधान्य दुकानदार हा सरकारकडून प्रत्येक व्यक्तीनुसार लाभार्थ्याला ५ किलो मोफत दिला जाणारा तांदूळ स्वस्तधान्य दुकानदार देत नसून तो प्रत्येक कुपना मागे ५ ते १० किलो तांदूळ कमी देत असून आमची पिळवणूक करत आहे.
या लाभार्थींच्या तक्रारीची लगेच दखल घेत आमदार लंके यांनी निंबळक येथील स्वस्तधान्य दुकानात जाऊन सदर दुकानदारास कडक शब्दात सुनावले, गोरगरीब जनतेची अशा पद्धतीने फसवणूक केली तर मी खपवून घेणार नाही, येणाऱ्या दोन दिवसात संपूर्ण लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे संपूर्ण गहू व तांदुळाचे वितरण झाले पाहिजे. जर यापुढे असली कोणतीही तक्रार माझ्याकडे आली तर जिल्हा पुरवठा विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा ही आमदारांनी स्वस्तधान्य दुकानदारास दिला.