अहमदनगर - घरासमोर खेळत असलेल्या एका साडेतीन वर्षाच्या चिमुरडीस बिबट्याने उचलून नेल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात घडली आहे. भोर मळ्याच्या परिसरातील उसाच्या शेतात हा बिबट्या लपून बसला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, बिबट्याच्या तावडीतून मुलीची सुटका करण्यास ग्रामस्थांना यश आले होते. मात्र, जखमी अवस्थेत आढळलेल्या मुलीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. प्राजक्ता तेजस मधे असे त्या चिमुरडीचे नाव आहे.
भोर मळा परिसरात राहणारी प्राजक्ता सायंकाळच्या सुमारास घरापुढील अंगणात खेळत बसली होती. त्यावेळी बिबट्याने अचानक झडप घालून प्राजक्ताला उचलून नेले. मधे यांच्या घराशेजारी असणाऱ्या उसाच्या शेतात बिबट्याने प्राजक्ताला उचलून नेले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले होते.
बिबट्या उसातच लपून बसला असल्याने बिबट्याच्या तावडीतून प्राजक्ताची सुटका करण्यासाठी ग्रामस्थांनी तातडीने प्रयत्न सुरू केले आणि फटाके फोडून बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जमावाने उसाच्या शेतात प्रवेश करताच बिबट्याने प्राजक्ताला टाकून उसामध्ये पळ काढला. दरम्यान, जखमी प्राजक्ताला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र, तिला उपचारासाठी संगमनेरच्या रुग्णालयात नेत असताना उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.