अहमदनगर - बारामतीमधून थेट नगर जिल्ह्यात कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत उतरलेले शरद पवार यांचे नातू रोहित पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या लक्षवेधी लढतीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. आज 19 ऑक्टोबरला कर्जत शहरात प्रचाराची सांगता होत असताना दोन्ही पक्षाकडून दिग्गज नेत्यांच्या सभा होत आहेत.
हेही वाचा - 'मी प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभर फिरतोय ते मात्र मंत्री असून गल्लीबोळात फिरतायत'
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सकाळी साडेनऊ वाजता सभा होणार आहे. तर अमित शाह यांची दुपारी 3 वाजता सभा पार पडणार आहे. या दोन्ही सभांना प्रचंड जनसमुदाय उपस्थित असण्याची शक्यता आहे. दोन्ही सभा या एकाच शहरात होत असल्याने दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची मांदियाळी आज दिवसभर कर्जत शहरात दिसणार आहे.
हेही वाचा - शिर्डीतील तेलगु समाज संघटनेचा राधाकृष्ण विखेंना पाठिंबा
शेवटच्या टप्प्यात प्रचार शिगेला पोहोचला असल्याने आणि एकूणच दोन्ही उमेदवारांसाठी ही लढत प्रतिष्ठेची असल्याने मोठे शक्ती प्रदर्शन होणार आहे. एकीकडे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह या सभांना संबोधित करणार असल्याने आणि मोठी गर्दी होणार असल्याने पोलीस-प्रशासनाने बंदोबस्ताची मोठी तयारी केली आहे.