शिर्डी: यंदा श्री साईबाबा संस्थान (Sri Sai Baba Sansthan) विश्वस्त व्यवस्था तसेच शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी ग्रामदैवत मारुती मंदीरापासून नामवंत पहिलवानांना फेटे बांधून गांवातून मिरवणूक काढून कुस्ती आखाड्यात आणण्यात आले. यावेळी माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष जगदीश सावंत, विश्वस्त डॉ एकनाथ गोंदकर, महेंद्र शेळके, अविनाश दंडवते, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, कैलासबापू कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, शिवाजी गोंदकर, यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते, सुधाकर शिंदे,बाबासाहेब कोते,दादासाहेब गोंदकर, नितीन कोते, निलेश कोते, मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते महिलांची पाच हजार रुपयांची कुस्ती लावण्यात आली. महिला पहेलवान लावंण्या गोडसे अहमदनगर व पुण्याच्या गायत्री खामकर यांच्यात अहमदनगरच्या गोडसेने बाजी मारत कुस्ती जिंकली. यावर्षी पहिले बक्षीस ७१ हजार रुपयांचे ठेवण्यात आले होते. तर ५१ हजार रुपयांची कुस्ती अनुपकुमार आणी नगरचा योगेश पवार यांच्यात झाली. यात योगेश पवारने बाजी मारली.
७१ हजार रुपयांची पहिली कुस्ती कोल्हापूरचा माऊली जमदाडे व दिल्ली येथील संजय दहिया यांच्यात झाली यात माऊली जमदाडे यांनी बाजी मारली. त्याचप्रमाणे ४१ हजार, १५ हजार रुपयांच्या दोन आणी महिलांंसाठी विशेष ११ हजार रुपयांच्या तीन कुस्त्या ठेवण्यात आल्या होत्या. पहिल्या चार कुस्त्या विजेत्या पहिलवानांना साईकेसरी पट्टा आणी चांदीची गदा देण्यात आली.
स्पर्धेसाठी उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली येथील हिंद केसरी तसेच महाराष्ट्र केसरी बहुमान पटकावलेले नामवंत पहिलवानांनी हजेरी लावली त्याच्या बरोबर हजारोंच्या संख्येने कुस्तीप्रेमींनी उपस्थित होते. त्यामुळे यंदाचा कुस्ती स्पर्धा ऐतिहासिक ठरला. या आखाड्यात ढाक, सवरी, एकलंगी,भांगडी, अरण, फासा,डुब, धोबीपछाड,एकेरी पट,दुहेरी पट असे डांव पहायला मिळाले. महिलांची मानाची ११ हजार रुपयांची कुस्ती तेजल सोनवणे व सासवडची यशस्वी खेडकर यांच्यात झाली यात तेजल सोनवणे हिने बाजी मारली.