अहमदनगर - मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आणि शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अभियंता संजीव भोर यांनी अहमदनगर दक्षिणेतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे घोषित केले आहे. नगर येथे ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात भोर यांनी ही घोषणा केली. २९ मार्च आणि २ एप्रिल रोजी भोर हे दोन अर्ज भरणार आहेत.
धनदांडग्याच्या विरोधात लढाई
आपली लढाई ही जिल्ह्यातील दोन प्रबळ कारखानदार आणि सत्ताधीश असलेल्या धनदांडग्या विरोधात आहे. युती आणि त्याअगोदर आघाडी कडून शेतकरी जनतेची घोर फसवणूक झालेली आहे. त्यामुळे आता बळीराजाला त्याच्या अडचणी-प्रश्न सोडवण्यासाठी सामान्य लोकप्रतिनिधी हवा असल्याने मी मैदानात उतरलो असल्याचे भोर म्हणाले.
युती सरकारने शेतकऱ्यांची आंदोलने मोडीत काढली
ईटीव्ही भारतशी बोलताना भोर म्हणाले की, युती सरकारने मराठा क्रांती मोर्चा, शेतकरी संप, धनगर-मुस्लिम आरक्षण आदींसाठी झालेली आंदोलने मोडून काढली. केवळ आश्वासने देत शेतकऱ्यांना फसवले आहे. त्यामुळे आता जनता जागृत झाली असून माझ्या सारख्या उच्चशिक्षित उमेदवाराच्या पाठीशी उभी राहून विजयी करेल. माझी निवडणूक जनता लढवत असून प्रचाराचा खर्च जनताच निधी गोळा करून करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कार्यकर्त्यांनी मला आज सतरा हजार रुपयांचा निधी गोळा करून सुपूर्त केल्याचे संजीव भोर यांनी स्पष्ट केले.
कोपर्डी आणि मराठा क्रांती मोर्चामुळे संजीव भोर चर्चेत
कोपर्डी निर्भया प्रकरणाच्या लढ्यात संजीव भोर यांचा मोठा वाटा आहे. याप्रकरणाचे गांभीर्य त्यांनी त्यावेळी सामाजिक माध्यमातून महाराष्ट्रात पोहचवले. पुढे याच आंदोलनाने मराठा क्रांती मोर्चाची निर्मिती झाली आणि शेतकऱयांचे प्रश्न मराठा आरक्षण आदी प्रश्नांवर राज्यभर लाखोंचे मूक मोर्चे निघाले. या मराठा क्रांती मोर्चा आंदोलनात भोर हे राज्य समन्वयक राहिले आहेत. अभियंता असलेले संजीव भोर आक्रमक आंदोलन करण्यामुळे चर्चेत राहिले आहेत. विविध आंदोलनात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून अनेकदा त्यांना यासाठी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे विखे-जगताप या लक्षवेधी लढतीत भोर आपली छाप कशी पाडतात हे पाहावे लागणार आहे.