अहमदनगर - मराठा समाजाच्या आरक्षणाला न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील सर्वपक्षीय सकल मराठा समाज पुन्हा एकवटून आक्रमक होऊन आपल्या आरक्षण मागणीसाठी रस्त्यावर उतरला. संगमनेरच्या सकल मराठा समाजाच्या वतीने आज संगमनेर बस स्थानकासमोर मोठया संख्येने 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - मराठा मोर्चा सनदशीर, गृहमंत्र्यांनी फोन टॅप करू नये- मराठा क्रांती मोर्चाची मागणी
यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने शासनास निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, एकेकाळी राज्यकर्ता असलेला मराठा समाज आज परिस्थितीमुळे गरीब झालेला आहे. ग्रामीण भागात आमच्या समाजाची आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची आहे. आम्हाला बळीराजा म्हटले जाते. पण आमची खरी अवस्था तर राज्यातल्या अगदी शेवटच्या माणसासारखी झाली आहे. तो बळी'राजा' राहिलेला नाही. त्यामुळे आम्ही रीतसर आरक्षणाची मागणी केली आहे. एक आदर्श घालून देत आम्ही आजवर लाखोंच्या संख्येने आंदोलन केली आहेत. भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या अपेक्षा आहेत त्याला अनुसरून आम्ही आजवर आंदोलन केले आहेत. आमच्या व्यासपीठावर आम्ही राजकारण्यांना येऊ दिलं नाही. एवढा सगळा लढा आम्ही दिला. पण आज न्यायालयाने स्थगितीचा निकाल दिला. त्यामुळे आम्हाला डावलले जात आहे, अशी समाजाची भावना होऊ नये, यासाठी फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी मराठा समाजातर्फे केली आहे.
निवेदनात सकल मराठा समाजाने खालील मागण्या केल्या आहेत -
1 ) राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल (देशातल्या 26 राज्यांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांच्या वर आहे. त्यामुळे पुनर्विचार याचिका दाखल करावी.) केल्यास आरक्षणाच्या तत्काळ अंमलबजावणीचा मार्ग सुकर होऊ शकेल.
2 ) सरकारने विशेष अधिवेशन बोलावून तातडीने अध्यादेश काढावा.
3 ) नवीन सरकारी नोकर भरती तत्काळ थांबवावी. (पोलीस भरती)
4 ) चालू वर्षीचे प्रवेशाला आरक्षण ग्राह्य धरून, शैक्षणिक फी माफी झाली पाहिजे.
5 ) आरक्षण स्थगिती आदेश निघण्यापूर्वी नोकरीसंदर्भात ज्या जाहिराती निघाल्या आहेत, त्या सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे.
6 ) सारथी या संस्थेचे पुनरुज्जीवन होऊन त्याला भरघोस निधी मिळालाच पाहिजे.
7 ) अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या जाचक अटी रद्द करून निधी वाढून मिळालाच पाहिजे.
अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - 'मराठा आरक्षणाला विरोध नाही, परंतु ओबीसीच्या कोट्यातून नको'