अहमदनगर- स्वातंत्र्य काळापासून राज्यातील मांग गारुडी समाज सर्वांगीण प्रगतीपासून वंचित राहिलेला आहे. यासाठी मांगगारुडी विकास महामंडळाची स्थापना करुन वंचित घटकाला न्याय द्यावा, अशी मागणी नेवासा तालुक्यातील देवगावचे सामाजिक कार्यकर्ते आणि मांग गारुडी समाज संघटनेचे अध्यक्ष अमर कसबे यांनी केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची समक्ष भेट घेऊन त्यांनी याबाबत निवेदन देत ही मागणी केली.
अमर कसबे आणि शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत मांग गारुडी समाज शिक्षणापासून वंचित असून बेरोजगारीने या समाजाला मोठे संकट उभे केलेले आहे. या समाजाची अर्थिक उन्नती होण्यासाठी राज्यात मांग गारुडी विकास महामंडळ नेमण्यात यावे, समाजाच्या विकासासाठी 500 कोटींचा निधी उभा करावा, तसेच मांग गारुडी समाजाला राज्यपाल नियुक्त कोठ्यातून विधान परिषदेवर सदस्य म्हणून संधी द्यावी, अशी मागणीही संघटनेचे अध्यक्ष अमर कसबे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.