अहमदनगर - महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्यावतीने आज शनिवार २५ मे रोजी शिर्डी साईबाबांच्या चरणी तब्बल १४ लाख रुपयांची माराझो कार अर्पण केली. साईबाबांच्या मध्यान आरतीपूर्वी कंपनीचे कार्यकारी संचालक डॉ. पवन गोयंका यांनी या कारच्या चाव्या साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांचेकडे सुपूर्द केली.
डॉ. गोयंका आणि ममता गोयंका यांनी या गाडीची विधीवत पूजा केली. यावेळी कंपनीचे प्लांट हेड प्रदीप देशमुख कर्नल, सी. एन. बॅनर्जी, प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमित, अशोक औटी, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, वाहन विभागाचे अतुल वाघ उपस्थित होते. आजपर्यंत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने जवळपास १४ वाहने भेट दिली आहेत. या वाहनाला साई संस्थान आपल्या कार्यालयीन कामाकरिता वापरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.