अहमदनगर - राष्ट्रवादीच्या स्थापनेपासुन पिचड कुटुंबीय हे शरद पवारांबरोबर होते. अकोले मतदारसंघातून गेली अनेक वर्षे मधुकर पिचड हे आमदार राहिले होते. मात्र, यावर्षी विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे गेल्या पाच वर्षात, आपले सरकार नसल्याने मतदारसंघात न झालेला विकास आणि इतर समस्या घेवुन वैभव पिचड प्रचार करत आहेत.
अकोले तालुक्यातील पिचड विरोधकांनी एकमोट बांधत राष्ट्रवादीकडून भाजपचेच जिल्हा परिषद सदस्य असलेल्या डॉ. किरण लहामटे यांना उमेदवारी दिली आहे. तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पिचड विरोधक अशोक भांगरे गट आणि माकपचे डॉ. अजित नवलेंची तसेच मेंगाळ आणि दराडे या शिवसेना पंचायत समिती सदस्यांचीही लहामटे यांना साथ मिळत आहेत.
हेही वाचा... भाजप शेतकऱ्यांच्या संसाराची होळी करतयं, कर्डीलेंना चूकन साथ दिली - शरद पवार
पिचड कुटुंबीयांवर अनेक आरोप आहेत. ते चौकशीच्या फेऱ्यात अडकायला नको, म्हणून ते सत्ताधारी भाजपमध्ये गेले, असे त्यांचे विरोधक म्हणतात. आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या अकोले विधानसभा मतदारसंघात निवडणुकीत मत विभाजन होऊ नये, यासाठी 'एकास एक उमेदवार' उभा करून पिचडांचा पराभव करण्याचा चंग यावेळी विरोधकांनी बांधला आहे.
हेही वाचा... '14 हजार शेतकरी आत्महत्येचे पाप कुठे फेडाल?'
अकोले विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. गेली ३५ वर्षे माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांची एकहाती सत्ता या मतदारसंघावर राहिली आहे. २०१४ च्या निवडणुकीत पिचड यांना ६७ हजार ६९४ मते मिळाली होती. शिवसेनेच्या तळपाडे यांना ४७ हजार ६२४ मते मिळाली. पिचड यांनी विजयश्री खेचून आणली असली, तरी विरोधकांना मिळालेली मते विचार करायला लावणारी होती. शिवाय भाजप व शिवसेनेचा स्वतंत्र उमेदवार असल्याने मतविभागणीही झाली होती.