अहमदनगर - तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट काेसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन महिलांसह तिघे जखमी झाले आहेत. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामधील एका इमारतीत ही दुर्घटना घडली. गंभीर जखमी झालेल्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार -
शहरातील नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये एका इमारतीमधील लिफ्ट काेसळून झालेल्या अपघातात शुभम झेंडे (वय १९) या युवकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ओंकार निमसे (वय १९), प्रिया पवार (वय ४०) व शीतल चिमखडे (वय २५) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यापैकी दोन जणांवर खाजगी तर एका महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयात दाखल जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघातात मृत्यू आणि जखमी झालेल्या व्यक्ती कामगार -
घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. काेतवाली पाेलिसांनी याची नाेंद घेतली आहे. या अपघाताबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत. सर्वसाधारणपणे लिफ्ट मेंटेनन्स एखाद्या एजन्सीला दिले असते. त्यांच्याकडून लिफ्टच्या सुरक्षा, तांत्रिक दुरुस्ती अपेक्षित असते. याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. मार्केट यार्ड परिसरात बाजार समितीच्या आवारातील ही घटना अभय मशिनरी दुकान असलेल्या इमारतीत घडली आहे. ही इमारत चार मजली आहे. अपघातात मृत्यू आणि जखमी झालेल्या व्यक्ती ह्या कामगार आहेत.