शिर्डी (अहमदनगर) - संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारात बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. येथील प्रवरा उजव्या कालव्यालगत बुधवारी सकाळी आश्वीकडे येत असताना तरुण साई मांढरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचा व्हिडिओ काढला असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तीन ते साडेतीन फूट उंच
बुधवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास येथील तरुण साई मांढरे हे आपल्या चारचाकी वाहनातून घराकडून आश्वी खुर्दकडे येत होते. यावेळी आठवडे बाजारतळापासून काही अंतरावर असलेल्या प्रवरा उजव्या कालव्यालगत असलेल्या लाकडी पुलाजवळ राहत असलेल्या सुनील भालेराव यांच्या घरालगत एक पूर्ण वाढ झालेल्या तीन ते साडेतीन फूट उंचीच्या बिबट्याने रस्ता ओलडला. त्यामुळे साई माढंरे यांनी आपल्या वाहनाचा प्रकाश तिकडे वळवून आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचा व्हिडिओ कैद केला आहे. यावेळी बिबट्याने लगतच्या झुडपातून पलायन केले.
'वनविभागाने जेरबंद करावा'
बिबट्या नजरेस पडलेल्या ठिकाणापासून काही अतंरावर मोठी लोकवस्ती व वर्दळीचे ठिकाण आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. तसेच काही दिवसापूर्वी याच ठिकाणापासून काही अंतरावर त्यांचे वडील राजेंद्र मांढरे यांनी बिबट्याच्या तावडीतून कुत्र्याची सुटका केली होती. त्यामुळे वारंवार हा बिबट्या नजरेस पडत असल्याने काही अघटित होण्याआधी हा बिबट्या वनविभागाने जेरबंद करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.