अहमदनगर - नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव या परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या आज अडकला आहे. धुमाकूळ घालणारा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव या परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातल्याने ग्रामस्थांनी वनविभागाला या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर वनविभागाने गणेश अशोक औटी या शेतकऱ्याच्या शेतात पिंजरा लावला होता. आज सकाळी दीड वर्षे वयाचा बिबट्या पिंजऱ्यात आडकल्याचे काही ग्रामस्थांनी पहिल्यानंतर नेवासा विभागाचे वनपाल यांना माहिती दिली.
यावेळी नेवासा विभागाचे वनपाल दशरथ झिंजुर्डे, वनपाल मुस्ताक सय्यद, वन कर्मचारी चांगदेव ढेरे, एस. आर. मोरे, डी. टी. गाडे, उपसरपंच दत्ता मुंगसे यांनी घटनास्थळी भेट दिली. पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या पिंजऱ्यासह तालुक्यातील लोहगाव येथील वनविभागाच्या नर्सरीमध्ये हलविला आहे. लोहगाव येथे बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती नेवासा विभागाचे वनपाल दशरथ झिंजुर्डे यांनी दिली आहे.