अहमदनगर - शिर्डीत रामनवमी उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरू झाला आहे. उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साई दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदीयाळी ही शिर्डीत दिसून येत आहे. साईनामाचा जयघोष करत शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. उत्सवासाठी साईबाबा मंदिरावर विद्युत रोषणाई तसेच साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
शिर्डीत रामनवमी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. भाविकांनी कावडीतून आणलेल्या गोदावरीच्या पाण्याची विधीवत पूजा करून साईमूर्ती आणि साई समाधीला जलाभिषेक करण्यात आला. कावडीतून आणलेल्या जलाने साईबाबांना मंगलस्नानही घालण्यात आले. दरम्यान सकाळी काकडाआरती नंतर बाबांची पोथी, विणा आणि प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली.
मध्यान्ह आरती अगोदर साईमंदिरासमोर रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. हजारो भाविकांनी शनिवारी मध्यरात्री राम जन्माचे मोठया भक्तीभावाने स्वागत केले. शिर्डीतील रामनवमी उत्सवाचा यंदाचे हे १०७ वे वर्ष आहे. भाविकांमघ्ये साईभेटीचा आनंद ओसंडून वाहत आहे. रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.
साई मंदिराच्या ४ नंबर प्रेवेशद्वारासमोर श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती असलेला ५० फुटी देखावा साकारण्यात आला. हा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने नटलेली महाद्वाराची प्रतिकृति भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र बिंदु ठरत आहे. मुंबई येथील द्वारकामाई मित्र मंडळाने स्वखर्चाने ही प्रतिकृती साकारली आहे. यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरीसचा उपयोग करण्यात आला आहे. रामनवमी उत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातुन भाविक येथे येत असतात. शिर्डीचा उत्सव हा भाविकांसाठी आनंद सोहळा असतो. साईबाबांच्या भेटीसाठी आतुर झालेला भक्तगण साई मूर्तीची केवळ एक झलक पाहाण्यासाठी असुरलेला असतो. तीन दिवस चालणाऱया या उत्सवातील उर्जा भाविकाला वर्षभर पुरणारी असते. त्यामुळेच हा उत्सव याची देही याची डोळा अनुभवन्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक साई दरबारी दाखल झाले आहेत. जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा, याकरिता साईमंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेत साई संस्थांनाच्यावतीने रात्रभर साई मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले.