शिर्डी (अहमदनगर) : जिल्ह्यात दररोज अवैध धंद्यावर कुठे ना कुठे कारवाई करण्यात येते. इंदोरहून कंटेनरमध्ये सोयाबीन आणि बेसनच्या गोण्यांच्या मागे बेकायदा गुटख्यांच्या शेकडो गोण्या भरून, पुण्याच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरला कोपरगाव तालुका पोलिसांनी येसगाव शिवारात नगर मनमाड महामार्गावरून ताब्यात घेतले. या कंटेनरमध्ये गुटख्याच्या लाखो रुपये किमतीचे शेकडो गोण्या आढळुन आल्या. याबाबत कोपरगाव तालुका पोलिसांनी कंटेनरसह चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच 50 लाखांचा गुटखा आणि कंटेनरसह कोटीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
गुटख्याच्या गोण्याची वाहतूक: याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक कंटेनर सोयाबीन आणि बेसन पीठाच्या गोण्यांच्या मागे अवैध पद्धतीने गुटख्याच्या गोण्या भरून वाहतूक करीत आहे. माहिती मिळताच वासुदेव देसले यांनी आपल्या फौजफाट्यासह येसगाव शहरात पोहोचले. चालत्या कंटेनरला अडवून खात्री केली. त्यामध्ये गुटख्याच्या शेकडो गोण्या आणि बॉक्स मिळून आले. याबाबत रात्री उशिरापर्यंत कंटेनरमधून सर्व गोण्या बाहेर काढण्याचे काम सुरू होते. तसेच चालक जमील अहमद, इद्रिस अहमद राहणार हरियाणा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कामगिरी: सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक संजय सातव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक महेश कूसारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गागरे, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास वाघ, रशीद शेख, जयदीप गवारे, पोना रामा साळुंके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन वांडेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र मस्के,प्रकाश नवाली युवराज खुळे आदींनी केली आहे.
51 लाखांचा गुटखा पकडला: याआधीही अशीच एक घटना घडली होती. बीड जिल्ह्यातील परळी येथे रात्री पोलिसांनी 51 लाखांचा गुटखा पकडला होता. 8 आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. सदरचा टेम्पो परळी ते गंगाखेड जाणार होता. या रोडवर असणाऱ्या एन के देशमुख यांच्या इंडियन पेट्रोल पंपाच्या बाजूला टेम्पो उभा करण्यात आला होता. त्यातील माल काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या वाहनाची तपासणी केली असता प्रीमियम राज निवास सुगंधी पान मसाला गुटख्याचे 69 मोठे पॅकेज होते. सुगंधी तंबाखूचे 14 मोठे पॅकेज असा एकूण 33 लाख 21 हजार 600 रूपये किमतीचा गुटखा माल व आयशर टेम्पोची किंमत अठरा लाख रुपये, पंधरा हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण 51 लाख रुपये 36 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल मिळून होता.
हेही वाचा -