अहमदनगर - मुली आणि महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यामागे दोषींना तत्काळ फाशीसारखी शिक्षा होत नसल्याचेही एक कारण आहे. सरकार कुणाचेही असो, दोषींना तत्काळ फाशी दिली जावी, अशी आम्हा पीडित कुटुंबाची इच्छा असल्याचे कोपर्डीतील निर्भयाच्या माता-पित्याने केली आहे. हाथरस घटनेच्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली.
सध्या देशभर उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणामुळे संतापाची लाट आहे. हाथरस घटनेनंतर पोलीस, जिल्हा प्रशासन, योगी सरकार यांचे वागणेही संशयास्पद आहे. विरोधी पक्षांनी आरोपींविरोधात तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर 16 जुलै 2016 ला नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील निर्भया प्रकरणातील पीडित कुटुंबाने हाथरस येथील कुटुंबासाठी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. गुन्हेगार कोणत्याही जाती-पातीचे असोत, तत्काळ शिक्षेची अंमलबजावणी होत नसल्यानेच अशा घटना वारंवार होत असल्याचा दावा निर्भयाच्या आई-वडिलांनी केला.
आजही कोपर्डीतील मुलीला न्याय मिळालेला नाही. सत्र न्यायालयातील फास्ट ट्रॅक कोर्टाने सव्वा वर्षात निकाल दिला, मात्र आता उच्च न्यायालयात अडीच वर्षे उलटूनही प्रकरण प्रलंबित आहे. निर्भयाचे आईवडील हतबल झाले असून मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याच्या मानसिकतेत आहे.
हाथरस घटनेने सध्या देश पुन्हा एकदा ढवळून निघत आहे. विरोधी पक्षांनी आरोपांची राळ उठवून मोर्चे-आंदोलने सुरू केली आहेत. मात्र, कोपर्डी असो वा दिल्लीतील निर्भया प्रकरण हेच चित्र दरवेळी दिसून येते. फास्ट ट्रॅकमध्ये आरोपींना फाशीची शिक्षाही होते. प्रत्यक्षात आरोपींच्या गळ्यात फास पडायला होणार उशीर, हा अक्षम्य आहे. त्यामुळेच पुन्हा-पुन्हा हाथरस, बलरामपूर, उन्नावसारख्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे आता फास्ट ट्रॅक सारखीच सुनावणी उच्च व सर्वोच्च न्यायालयात होऊन दोषींना तत्काळ फासावर लटकावले जावे, अशी मागणी कोपर्डीतील निर्भयाच्या कुटुंबाने केली आहे.