अहमदनगर - कुणी काय आणि कधी खावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय असतो. मात्र, ज्यावेळी काही ठराविक काळात मांसाहार करू नका अशी विनंती वजा सक्ती वाटेल अशी सूचना केली जाते तेव्हा निश्चितच असे निर्णय वादग्रस्त होऊ लागतात. असाच काहीसा निर्णय अहमदनगर जिल्ह्यातील कान्हूर पठार येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने गावच्या सरपंचांनी तशी विनंती वजा सूचना फलकावर लावली. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यास आक्षेप घेतला आहे.
सध्या कल्याण कृतिका नक्षत्र सुरू आहे. त्यामुळे ११ मे ते २५ मे दरम्यान मांसाहार करू नये, असे आवाहन सरपंच अरुण काकडे यांनी केले आहे. याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येताच सरपंच आणि ज्येष्ठ ग्रामस्थांनी हा निर्णय लोकभावनेतून घेतला असला तरी सक्तीचा नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा श्रद्धेचा विषय असून अंधश्रद्धा आम्हालाही मान्य नाही, अशी समजुतीची भूमिका त्यांनी घेतल्याचे दिसत आहे.
कल्याण कृतिका नक्षत्रात मांसाहार केल्यास पाऊस पडत नाही, अशी श्रद्धा हिंदू धर्मात आहे. मात्र, सरपंचांनी तशी सूचनाच फलकावर लावल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नापसंती व्यक्त केली आहे. पारनेर तालुक्यात अण्णा हजारे, पोपटराव पवार यांच्या सारखे समाजसेवक विज्ञानाची कास पकडत जल संवर्धनाची कृतीमय कामे करत आहेत. ग्रामपंचायतीसारख्या संवैधानिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये, असे आवाहन अंनिस कार्यकर्ते कैलास लोंढे यांनी केले आहे. या प्रकरणात समस्थ ग्रामस्थानी पुढे येत हा निर्णय सरपंच, ज्येष्ठ ग्रामस्थांचा किंवा ग्रामपंचायतचा निर्णय नसून लोकभावनेतून घेतलेला आहे. मात्र, हा निर्णय सक्तीचा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.