अहमदनगर - आज मंगळवारी दुपारी रेल्वेची धडक बसून एका माध्यम प्रतिनिधीचा मृत्यू झाला. ते दैनिक भास्कर वृत्तपत्राचे नगर जिल्हा प्रतिनिधी होते. उमेश दारुनकर (वय 39) असे मृत पत्रकाराचे नाव आहे.
मागील पंधरा वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. नगरच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमात तसेच सध्या हिंदी वृत्तपत्र 'दैनिक भास्कर'चे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे. महानगर न्यूज, सहारा समय या वाहिन्यांसाठी देखील त्यांनी काम केले होते.
आज दुपारी चार वाजताच्या सुमारास नगर-कल्याण रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिज ओलांडतांना गोवा एक्सप्रेसने त्यांना धडक दिली. तोंडावरून रेल्वेचे चाक गेल्याने त्यांचा चेहरा ओळखू येत नव्हता. मात्र, ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.