अहमदनगर - अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या नावापुढे जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. यावर पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी टीका केली आहे. नावापुढे जात लावणे म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांना गालबोट लावण्यासारखे आहे, असे ते म्हणाले. अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कवाडेम्हणाले, की अॅड.आंबेडकर हे आजपर्यंत जाती अंताविषयी बोलत होते़. शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्यावरील जातीचा उल्लेख काढून टाकावा, अशी त्यांची मागणी होती. मात्र, त्यांनीच उमेदवारांच्यासमोर जातीचा उल्लेख केला आहे.आता आंबेडकर यांच्या जाती अंताच्या लढ्याला काय अर्थ आहे? असा सवाल कवाडे यांनी उपस्थित केला.
कवाडेंची आघाडीकडे चार जागांची मागणी
लोकसभा निवडणुकीत पिपल्स रिबब्लिकन पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष व लोकाधिकार पक्ष यांची महाअघाडी आहे.आम्ही महाआघाडीकडे महाराष्ट्रातील ४ जागांची मागणी केली आहे.यामध्ये शिर्डी, अमरावती, रामटेक व इचलकरंजी यांचा समावेश आहे. आम्हाला किमान २ जागा मिळतील अशी अपेक्षा आहे.या निवडणुकीत पक्षाने आदेश दिला तर आपण स्वत: निवडणूक लढविणार आहोत. महाआघाडीत येण्याचे वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रण दिले होते.त्यांनी मात्र त्याला प्रतिसाद दिला नाही असे कवाडे यांनी सांगितले.