अहमदनगर - आंदोलन करणे हा राज्यघटनेने दिलेला संविधानिक अधिकारी आहे. तसेच त्याचा वापर करणे हे चुकीचे नाही. मात्र, आंदोलनामध्ये हिंसेला थारा असता कामा नये, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले. देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. त्याबाबत त्यांना विचारले असता ते बोलत होते. मात्र, कायद्याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला.
नागरिकत्व सुधार कायद्याबाबत माझा जास्त अभ्यास नाही. त्यामुळे मी याबाबत काही बोलणार नाही. मात्र, परिवर्तनासाठी आंदोलन करणे काही चुकीचे नसल्याचे अण्णा म्हणाले. आपण सार्वजनिक जीवनात समाजकार्य करत असताना गेल्या ३५ वर्षांमध्ये अनेक आंदोलने केली. मात्र, या आंदोलनात एक साधा दगडही कुणी हाती घेतला नाही. त्यामुळे संविधानाने दिलेल्या आंदोलनाचा मार्ग अवलंब करताना शांती आणि संयमपूर्वक आंदोलन केले पाहिजे. त्यामुळे अशा आंदोलनाला यश मिळते, असे अण्णा म्हणाले.