अहमदनगर - संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील अकलापूर गावा अंतर्गत असलेल्या एलखोपवाडी परिसरातील गाढवलोळी येथील आदिवासी व्यक्तीने जिलेटीनची कांडी तोंडात धरून स्फोट केला. यामुळे तो जागीच ठार झाला. ही खळबळ जनक घटना मंगळवार दिनांक २९ सप्टेंबरला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. ठार झालेल्या व्यक्तीचे नाव सुखदेव किसन मधे (वय ४६) असे आहे. या जिलेटीनच्या स्फोटाने मधेंच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्या होत्या. या घटनेने पठारभागासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या घटनेची मिळालेली माहिती अशी, की अकलापूर गावाअंतर्गत असलेल्या गाढवलोळी याठिकाणी सुखदेव मधे हा आदिवासी व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहात होता. मंगळवार दिनांक २९ सप्टेंबरला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सुखदेव मधे हे दारूच्या नशेत आपल्या घरी आला. त्याच वेळी त्यांचा मुलगा अनिकेत हा जेवन करण्यासाठी वडिलांना विचारण्यासाठी गेली असता त्यावेळी त्यांनी जेवण करण्यास नकार दिला. त्या नंतर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सुखदेव हे आपल्या पत्नी बरोबर भांडण करू लागले. त्यामुळे भांडण करू नका, असे मुलाने सांगितले. मात्र, तरीही सुखदेव हे काही समजून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्यानंतर रागाच्या भरात सुखदेव यांनी घरात जावून आतमधून दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर सुखदेव यांनी दारूच्या नशेत जिलेटीनची कांडी तोंडात धरली आणी घरातच असलेल्या वीज बोर्डातून विजेचा प्रवाह चालू केल्याने काही क्षणातच सुखदेव यांचे शीर धडावेगळे होत चिंधड्या उडाल्या जोराचा आवाज झाला. घरातील सदस्यांनी खोलीच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली.
माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे, सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, राजेंद्र लांघे, किशोर लाड, हरिश चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण यांच्या सह अप्पर पोलीस अधिक्षीका दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची पाहणी करत खबरदारीचा उपाय म्हणून शिर्डी येथील बाॅम्ब नाशक पथकाला पाचरण करण्यात आले होते. या प्रकरणी अनिकेत मधे यांनी दिलेल्या माहितीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास घारगाव पोलीस करत आहे.