अहमदनगर - निवडणूक आयोगाने नुकतीच देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी या २ लोकसभा मतदार संघासंदर्भातील माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली. आचारसंहिता लागू झाली असल्याचे सांगत जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले.
आचारसंहितेचे पालन न करणाऱ्या आणि गैरप्रकार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण ३३ लाख ९३ हजार ८७ इतके मतदार आहेत. त्यापैकी नगर दक्षिण मतदारसंघात १८ लाख ३१ हजार ५३७ इतके मतदार असून शिर्डी या अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदार संघामध्ये १५ लाख ६१ हजार ५५० इतके मतदार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, की आदर्श आचारसंहितेचे पालन होत नसल्यास नागरिकांनी सी-व्हिजिल अॅपवर किंवा समाधान अॅपवर तक्रार नोंदवावी. जिल्हानियंत्रण कक्षात याबाबत तातडीने दखल घेण्यात येऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या व्यक्तींवर हद्दपारीची प्रकरणे प्रलंबित आहेत, तसेच ज्यांचे शस्त्र परवाने रद्द करणे गरजेचे आहेत याबाबत संबंधित विभागाला तातडीने कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या २ दिवसांपूर्वीच शहरातील ३ आमदारांसह एक माजी आमदार अशा महत्त्वाच्या ६ राजकीय पक्षांच्या नेत्यांचे शस्त्र परवानेही जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहेत.