शिर्डी (अहमदनगर)- किर्तनकार इंदोरीकर महाराजांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यात त्यांनी 31 मार्चपर्यंत सर्व कीर्तनाचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळवले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनतेला घराबाहेर न निघण्याचे आवाहन केले आहे. याचे पालन करण्यासह शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन इंदोरीकर महाराजांनी केले आहे. आपलं गाव, आपले शहर आणि आपला देश यातून मुक्त करायचा असेल तर हे कुणा एकट्याचे व प्रशासनाचे काम नसून सर्वांचा लढा आहे. यात आपण सहभागी झाले पाहिजेत असे इंदोरीकर महाराज यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सर्वांनी खबरदारी घ्या, सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. घराबाहेर पडू नका, प्रवास टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्या व शासनाला सहकार्य करा. मी पण घरी आहे तुम्ही पण बाहेर पडू नका, असे इंदोरीकर महाराज यांनी म्हटले आहे.