संगमनेर - खुद्द महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याच गावात अवैध वाळू उपसा सुरू आहे. याविरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला असून, अवैध वाळू उपसा रोखण्याच्या मागणीसाठी नदीपात्रात आंदोलन करण्यात आले. महसूल अधिकारी वाळू तस्करांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील यावेळी नागरिकांनी केला आहे.
वाळू तस्कारांविरोधात कारवाईची मागणी
तालुक्यातून जाणाऱ्या मुळा आणि प्रवरा नद्यांच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. याविरोधात अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप खांडगाव ग्रामस्थांनी केला आहे. याविरोधात ग्रामस्थांच्या वतीने नदीपात्रात ठिय्या आंदोलन करण्यात आले. संगमनेर शहराजवळ असलेल्या गंगामाई घाट परीसरात नागरिकांनी हे आंदोलन केले. दरम्यान पुढील दोन दिवसांत जर वाळू तस्करांवर कारवाई झाली नाही, तर रास्तारोको करण्यात येईल असा इशाराही यावेळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.