अहमदनगर - धामोरी येथील गोदावरी नदी पात्रात कोपरगाव तालुका पोलिसांनी धाड टाकत, दोन ट्रॅक्टर, ट्रॉली, व दोन ब्रास वाळू असा 6 लाख रुपयांचा मृद्देमाल जप्त केला आहे. संबंधित शुभम विश्वनाथ गवारे (रा. मंजूर) कैलास गाढे (रा. चासनळी) एकनाथ माळी (रा. मोर्विस) बबलू बाळासाहेब कापसे (रा. कासारी) हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू चोरी करताना आढळून आले. दरम्यान, पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
संशयित पळाले
यातील घटनेतील एकनाथ माळी हा गोदावरी नदी पात्रात ट्रॅक्टर ट्रॉली सोडून पळून गेला आहे. तर, बबलू कापसे हा गोदावरी नदीपात्रातून ट्रॅक्टर ट्रॉलीसह पळून गेला. यानंतर येथील पोलीस अंबादास वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप काशीद हे करत आहेत.