अहमदनगर (शिर्डी): त्रिपुरा राज्याचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार बिल्पब कुमार देब यांनी आज (रविवारी) शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. देशातील जनता सुखी आणि समृद्धी राहो, माझा हातून जनतेचे भले व्हावे अशी प्रार्थनाही देब यांनी साईचरणी यावेळी केली. दरम्यान साईबाबा मंदिर प्रमुख आणि जनसंपर्क विभागाचे अधिकारी यांच्याकडून देब यांचा शॉल आणि साईमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
मला राहावले गेले नाही: साईबाबांचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर आल्यानंतर 'ई टीव्ही भारत'शी बोलताना बिल्पब कुमार देब म्हणाले की, माझा एक मित्र शिर्डी साईबाबांचा परमभक्त आहे. त्याने मला साईबाबांची महिमा आणि लीला सांगितल्यानंतर मला राहावले गेले नाही. त्यामुळे आज मी साईबाबांच्या दर्शनासाठी आलो होतो. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मनाला समाधान मिळाले असल्याची प्रतिक्रिया देब यांनी दिली.
दर्शनासाठी शिफारस लवकरच बंद होणार: शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी लवकरच साईबाबा संस्थानकडून एक आनंददायी बातमी मिळणार आहे. साईबाबांच्या आरतीसाठी व्हीआयपी पासेससाठी लागणारी शिफारस लवकरच बंद होणार आहे. यासंदर्भात प्रस्ताव तयार करून तदर्थ सदस्य समिती समोर मांडणार असल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले.
साईभक्तांचा त्रास होणार कमी: शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी मिळणारा व्हीआयपी पासचा सुरु असलेला काळाबाजार रोखण्या बरोबरच, साईभक्तांना होणार त्रास कमी करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थानचे अधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवरती चर्चा व निर्णय घेण्यात आले आहे.
झटपट दर्शनाचा नावाखाली भाविकांची लूट: साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो तर, उत्सव काळात लाखो साईभक्त शिर्डीत येतात. साईबाबांचे झटपट दर्शन आणि आरती पास काढून देण्याच्या नावाखाली शिर्डीत अनेकदा साईभक्तांच्या फसवणुकीचे प्रकार देखील समोर आले आहेत. काही सुरक्षा रक्षकांना हाताशी धरून पैसे कमावण्याचा अनेकांनी धंदा सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला आहे. साईबाबांचा आरतीपास घेण्यासाठी लागणारी शिफारस यामुळे भक्तांची लूट होत असल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आले.