शिर्डी : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारने नियम कडक करत हॉटेलचालकांना पन्नास टक्के क्षमतेने व्यवसाय चालू ठेवण्याचे आदेश दिले. मात्र साई नगरी शिर्डीत भाविकांची संख्या रोडावल्याने क्षमतेच्या पाच टक्केही ग्राहक येत नसल्याने हॉटेल चालकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
शिर्डी लॉकडाऊनला एक वर्ष पूर्ण
देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर 17 मार्च 2020 ला शिर्डीचे साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांत शिर्डीत लॉकडाऊन करण्यात आल्याने शिर्डीतील सर्वच व्यवसायही ठप्प झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव हाळूहाळू कमी होण्यास सुरुवात झाल्यानंतर तब्बल 9 महिन्यांनी म्हणजे 16 नोव्हेंबरला साईंचं मंदिर पुन्हा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. साईमंदिर खुले झाल्यानंतर शिर्डीतील काही रेस्टारंट व हॉटेल पुन्हा उघडले. तर काहींनी मात्र भाडे परवडणारे नसल्याने अजूनही हॉटेल्स उघडले नाही.
नवीन नियमामुळे भाविकांचा संख्येत घट
साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुले करण्यात आल्यानंतर साई दर्शनासाठी भाविकांचा ओघ पुन्हा वाढण्यास सुरुवात झाल्याने व्यवसाय सुरळीत होण्याची आशा अनेक दुकान व हॉटेल मालकांना होती. मात्र राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने साई संस्थानने भाविकांना साई दर्शनासाठी नवीन नियमावली तयार केली. याचा भाविकांच्या संख्येवर मोठा परीणाम झाला. त्यात आता राज्यसरकारने नवीन नियमांनुसार पन्नास टक्के ग्राहकांना रेस्टारंटमध्ये प्रवेश देण्यास मुभा दिली आहे. मात्र शिर्डीत भाविकांची संख्या घटल्याने ग्राहकांची प्रतीक्षा करण्याची वेळ हॉटेल चालकांवर ओढविली आहे. राज्य सरकारने शिर्डीसाठी सूट द्यावी अशी मागणी हॉटेल व्यवसायिकांकडून केली जात आहे. कोरोनाचे नवीन नियम आणि त्यात उन्हाचा वाढता कडाका यामुळे शिर्डीतील व्यवसाय आजही ठप्प असून शिर्डीत अघोषित संचारबंदी बघण्यास मिळत आहे.