अहमदनगर - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील व जगातील अनेक देशांतील शाळा बंद असताना महाराष्ट्रातील आदर्श गाव हिवरे बाजारने आणखी एक आदर्श निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नसला आणि राज्यात एकही शाळा सुरू नसली तरी हिवरेबाजार ग्रामसभेने गावातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गावात एकही कोरोना रुग्ण नसल्याने अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार ने मात्र प्रत्यक्षात शाळा सुरु करण्याचा निर्णय घेत पाचवी ते दहावी चे वर्ग सुरू केले आहेत.
राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत तसा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी गावातील सर्व पालकांनी एकमुखी तशी मागणी केली होती. पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा शालेय शिक्षण विभागाला विचारणा करण्यात आली होती, मात्र त्याला कोणतेही उत्तर शिक्षण विभागाकडून देण्यात आले नाही. राज्यात अद्याप शिक्षण विभागाने तसा निर्णय घेतलेला नसल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची पंचाईत झाली होती. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत हिवरेबाजारने ग्रामसभेत पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि कोरोनाकाळात राज्यातील प्रत्यक्षात पहिली शाळा आता सुरू झाली आहे.
गेल्या वर्षी मार्च 2020 पासून कोरोनाचा कहर वाढला आणि राज्य शासनाने राज्यात लॉकडाऊन करताना सर्व शाळाही बंद केल्या. या कालावधीत शाळा महाविद्यालये सुरू करायची अथवा नाही. परीक्षा कशा पद्धतीने घ्याव्यात याबाबत मोठा उहापोह झाला. मात्र प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याऐवजी ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू झाल्या. ऑनलाइन शिक्षणात सर्वाधिक अडचणी या ग्रामीण भागात दिसून आल्या. गावात मोबाईल नेटवर्कचा अभाव, अनेक पालक गरीब असल्याने त्यांच्याकडे पाल्यांसाठी स्मार्टफोन नसणे, स्मार्टफोन मोबाइल वापरायची माहिती पालकांना आणि पाल्यांना पुरेशी नसल्याने ग्रामीण भागात या अडचणी समोर आल्या.
हिवरेबाजार शाळेसाठी पाळणार हे नियम -
- शाळेच्या प्रवेशद्वारावरच प्रत्येक मुलांची आरोग्य तपासणी.
- ताप असल्यास किंवा आजारी असल्यास प्रवेश दिला जाणार नाही.
- मास्कचा वापर तसेच हात सॅनिटराईज केले जाणार.
- प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसणार.
- शाळेत येताना जेवणाचे डब्बे आणता येणार नाहीत.
- मैदानी खेळ होणार नाहीत.
- शाळेत येताना आणि जाताना वाटेत कुठेही थांबावयाचे नाही.
- शाळा सकाळी आठ ते दहा या वेळेत भरणार.
मुलांच्या आरोग्याची सर्व जबाबदारी गाव उचलणार -
हिवरे बाजारमध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून यशवंत विद्यालय ही माध्यमिक शाळा आहे. राज्यात कुठेही शाळा सुरु करण्यास शासनाने अद्याप कोरोनाच्या भितीने परवानगी दिलेली नाही. मात्र हिवरेबाजारनेही जोखीम स्थानिक परिस्थिती पाहून घेतली आहे. मागील वर्षी मार्च 2020 पासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याने हा निर्णय गावाने एकत्र येत घेत असल्याचे राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी सांगितले आहे. कोणत्याही मुलाला काही त्रास उद्भवल्यास त्याच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी पूर्ण गावाने घेतलेली आहे. सध्या पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले असून येत्या सोमवारी (21 जूनपासून) पहिली ते चौथीचे वर्गही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोपटराव पवार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
राज्यात १५ जूनपासून ऑनलाइन वर्ग सुरू -
कोरोना संकटाच्या काळात सलग दुसऱ्या वर्षी राज्यातील शाळा ऑनलाईन माध्यमातूनच सुरू झाल्या आहेत. राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू झाले आहे. प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याबाबत मात्र अद्याप राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आजही अनेक जिल्ह्यांत कडक लॉकडॉऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यातील शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे.
शाळा प्रत्यक्षात सुरू करण्यासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच शाळा तूर्तास ऑनलाईन माध्यमातूनच सुरू करण्याच्या सूचना शिक्षण विभाग देणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत कोरोनाची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे राज्य सरकारने टप्प्यांनुसार लॉकडॉऊनचे निर्बंध लागू केले आहेत. तेव्हा शाळा सुरू करत असताना सरसकट सगळीकडे एकाचवेळी शाळा सुरू करता येणार नाहीत, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
शिक्षक व पालकही संभ्रमात -
आपल्या जिल्ह्याची कोरोना परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू झाले म्हणजे शाळा सुरळीत सुरू झाल्या असे होत नाही, अशी प्रतिक्रिया शिक्षक देत आहेत.
शाळा नेमक्या कोणत्या पद्धतीने सुरू करायच्या? शाळा ऑनलाईन असणार की ऑफलाईन? कोणत्या इयत्तेला किती तास शिकवायचे? अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे का? असे अनेक प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षकांसमोर आहेत.
कोरोनामुक्तीतही हिवरेबाजारचा यशस्वी पॅटर्न -
देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढत असताना हिवरे बाजार हे गाव मात्र कोरोना मुक्त झाले आहे. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील या गावाने कोरोनामुक्तीसाठी नवा पॅटर्न राबवला व तो यशस्वी करून दाखवला.
हिवरेबाजारचा कोरोना पॅटर्न -
- गावातील प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन केले. त्याचबरोबर मास्कचा वापरही केला.
- केवळ सोशल डिस्टन्सिंगच नव्हे तर प्रत्येक घराला सॅनिटायझेशनसाठी उपयोगी साहित्य ग्रामपंचायतीकडून पुरवण्यात आले.
- बाजारामध्ये सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे का, याकडे लक्ष ठेवण्यासाठी चार गट नेमण्यात आले.
- शेतीच्या कामासाठी बाहेरच्या गावांमधून, राज्यांमधून येणाऱ्या मजुरांना, कामगारांना गावाबाहेरच राहण्याची विनंती करण्यात आली.
- ग्रामपंचायतीचा एक गट दर आठवड्याला प्रत्येक गावकऱ्याची ऑक्सिजन पातळी आणि तापमानाची नोंद करत होता.
- गावातून बाहेर जाणाऱ्या प्रत्येकाला परत येताना सॅनिटायझेशन करणे बंधनकारक होते. त्यांनी स्वतःला आपल्या परिवारापासून आणि गावकऱ्यांपासून विलग ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते. गावात मोठ्या प्रमाणात लसीकरणही झाले आहे.