शिर्डी High Market Price For Pomegranates : शेतकऱ्यानं आपल्या शेतीत पिकवलेल्या शेत मालाला कधी उच्चांकी दर मिळेल तर कधी दर कोसळेल हे सांगता येत नाही. एकीकडं गेल्या काही दिवसांपासून उच्चांकी असलेले टोमॅटोचे दर अचानक कोसळल्यानं टोमॅटो फुकट वाटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. तोच दुसरीकडं शेतकऱ्यानं आपल्या शेतात पिकवलेल्या डाळिंबाला उच्चांकी तब्बल 800 रुपय प्रति किलो दर राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाल्याचं पाहायला मिळतंय.
आतापर्यंतचा सर्वात जास्त दर : पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील युवा शेतकरी रमेश गाडेकर यांनी आपल्या शेतात डाळिंबाची बाग फुलवली होती. या डाळिंबाच्या बागेतून निघालेला माल गाडेकर यांनी काल शिर्डी जवळील राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री करण्यास घेऊन आल्यानंतर त्यांच्या इतर डाळिंबाला सरासरी 200 रुपये प्रति किलो भाव मिळलाय. तर भगवा व्हरायटीला हमाली, तोलाई आणि इतर खर्च वजा करता प्रतिकिलो 800 रुपयांचा दर मिळालाय. या व्हरायटीच्या 26 किलो डाळिंबाला तब्बल 16 हजार रुपये मिळाल्यानं शेतकऱ्यानं आनंद व्यक्त केलाय. आत्तापर्यंत डाळिंबाला प्रतिकिलो मिळालेला हा सर्वात जास्त दर असल्याचा दावा शेतकरी गाडेकर आणि व्यापारी शिंदे यांनी केलाय.
आम्ही केलेल्या डाळिंब बागेची योग्य ती काळजी घेतली असून ऑरगॅनिक पद्धतीनं उत्कृष्ट डाळिंब पिकवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पावसामध्ये सुद्धा आम्ही स्प्रेचा वापर करुन योग्य ती काळजी घेतो. त्यामुळं आमची डाळिंब उत्कृष्ट गुणवत्तेची असल्यानं दरही चांगला मिळाला. - शेतकरी रमेश गाडेकर
26 किलोच्या कॅरेटला 16 हजार रुपये भाव : राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी डाळिंब विक्रीसाठी घेऊन येतात. नारायणगाव येथील रमेश गाडेकर हे गेल्या तीन वर्षांपासून राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब विक्रीला घेऊन येत आहेत. त्यांच्या डाळिंबाची सुपिरियर गुणवत्ता होती. त्यामुळं त्यांच्या डाळिंबाच्या 26 किलोच्या कॅरेटला 16 हजार रुपये भाव मिळालाय. त्यांचे एक डाळिंब पाचशे ते आठशे ग्रॅम वजनाचे असून उत्तर भारतात अशा डाळिंबांना जास्त मागणी आहे. त्यामुळं दरही चांगला मिळत आहे, असं यावेळी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सांगितलंय.
हेही वाचा :
- A Boon For Farmers : शेतकऱ्यांनो आता पावसाची चिंता सोडा; जळगावातील शेतकरी पुत्रानं केलं अनोख संशोधन
- Nashik Onion Subsidy : नाशिक जिल्ह्यात कांदा अनुदानासाठी 1 लाख 72 हजार शेतकरी पात्र; 453 कोटी 61 लाखांचं लवकरच होणार वाटप
- Tomato Farmer Crorepati : लाल टोमॅटोमुळे शेतकरी झाला मालामाल! टोमॅटो विकून कमावले करोडो रुपये!