अहमदनगर - गेल्या काही दिवसांपासून उन्हाने बेजार झालेली साईनगरी चिंब पावसाने न्हाऊन निघाली. गुरुवारी संध्याकाळी शिर्डीत वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा पसरल्याने शिर्डीकरांना दिलासा मिळाला.
कारोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिक घरात आहेत. त्यात कडक उन्हाळा सुरू असल्याने अनेक दिवसांपासून नागरिक गर्मी आणि घामाने बेजार झाले होते. मात्र, गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अर्धा तास शिर्डीत हजरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शिर्डीकरांची तारांबळ उडाली होती. मात्र यामुळे, अनेक दिवसांच्या उकाड्यापासून हैरान झालेल्या नागरिकांना काही क्षणाचा दिलासा मिळाला. राज्यातही अनेक ठिकाणी अधूनममधून पावसाची ये-जा सुरू असून यामुळे मे महिन्यात उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे.