पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत, शरद पवार हे जातीयवादाचे आद्य संत असल्याचं म्हटलं होतं. यावर रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले म्हणाले, "शरद पवार जातीपातीचं राजकारण करतात असं मला वाटत नाही. आम्ही त्यांच्यासोबत राहिलेलो आहे. प्रत्येकच पक्ष उमेदवार देताना जातीचा विचार करतो. शरद पवारांवर असलेले आरोप मला मान्य नाहीत. मात्र काँग्रेसनं जातिवाद संपुष्टात आणला नाही, तो संपुष्टात यावा अशी आमची अपेक्षा आहे". पुण्यात आज रामदास आठवले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.
हेलिकॉप्टर आणि बॅग चेक केली : यावेळी रामदास आठवले म्हणाले, "मी आज संगोल्याला गेलो होतो. तसंच दोन दिवसांपूर्वी लातूरला गेलो या दोन्ही ठिकाणी निवडणूक आयोगानं माझी बॅग आणि हेलिकॉप्टर देखील चेक केलं. हा विषय निवडणूक आयोगाचा असून सरकारचा अजिबात नाही. फक्त उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर चेक केलं असं नाही". त्यामुळं या विषयाचा राजकीय बाऊ करू नये आणि अशा गोष्टींना आपण समोर गेलं पाहिजे.
महायुतीकडून आमच्यावर अन्याय होऊ नये : ते पुढे म्हणाले, "या विधानसभा निवडणुकीत माझ्या पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. 4 ते 5 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती. काही कार्यकर्ते नाराज होते. आपल्याला सत्तेत सहभाग मिळणार आहे असं मी त्यांना सांगितलं आणि ते कामाला लागलेले आहेत. जे लागलेले नाहीत त्यांनी महायुतीचे काम सुरू करावं. तसंच पुढे तरी महायुतीकडून आमच्यावर अन्याय होऊ नये याबाबत मी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी बोलणार असल्याचं आठवले म्हणाले.
हेही वाचा -