पालघर - कोविडच्या काळात औषध खरेदी, शवपेट्या खरेदीत पैसे खाल्ल्यामुळेच त्यांच्या बॅगा चेक होत असाव्यात, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. राज्य सरकार पैसे खाणारे नसावे, घर भरणारे नसावे, तर लोकांच्या घरात आनंद निर्माण करणारे असावे, अशा पद्धतीनं आमचं काम सुरू असून महाराष्ट्रात सामान्य माणसांना सुपरमॅन बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर पालघर हा आता ग्रामीण भाग राहणार नसून ते महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालघर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं. तर ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर टीकेचे वाग्बाण सोडले. यावेळी आमदार श्रीनिवास वनगा, केदार काळे, कुंदन संखे, भरत राजपूत, वैदेही वाढान, आनंद ठाकूर उपस्थित होते.
सर्वच लाडके विरोधकांना सत्तेची दारे बंद करणार - यावेळी शिंदे म्हणाले की, लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांची बोलती बंद झाली आहे, म्हणून लाडकी बहीण योजना बंद पडण्यासाठी सावत्र भाऊ आणि दुष्टभावांनी प्रयत्न केला. त्यासाठी ते न्यायालयात गेले; परंतु न्यायालयाने त्यांना हुसकावून लावले. दीड हजार रुपयात बहिणींना विकत घेता का, अशी आमच्यावर टीका करून त्यांनी लाडक्या बहिणीचा अपमान केला. आता या लाडक्या बहिणी विरोधकांना सत्तेची दारं कायमची बंद करणार आहेत, असा विश्वास व्यक्त करताना यापूर्वीच्या योजनेत ज्या लाडक्या बहिणी वंचित राहिल्या आहेत, त्यांनाही आमचं सरकार आल्यानंतर वंचित ठेवणार नाही, असं शिंदे यांनी सांगितलं.
सर्वच मुलींना उच्च शिक्षण मोफत - राज्य सरकार हे जनतेच्या आशा आकांक्षांचा विचार करून काम करणारे असायला हवे, असं सांगताना शिंदे यांनी एक उदाहरण दिलं. रात्री एक वाजता टीव्हीवर बातमी पाहिली. त्यात पैसे नसल्याने एका मुलीनं शिक्षण घेता येत नाही, म्हणून आत्महत्या केली. या घटनेनं आपल्या मनाला खोल वेदना झाल्या. त्याचवेळी आपण उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सांगून राज्यातील सर्व मुलींच्या उच्च शिक्षणाचा खर्च सरकार करणार असल्याचं सांगून तशी घोषणा करायला लावली, असं ते म्हणाले.
मला हलक्यात घेतले, म्हणून तुमचे टांगे पलटी - राज्यात लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडक्या बहिणी, लाडके वृद्ध अशा सर्वांचीच सरकार काळजी घेत असून त्या प्रत्येकाने आता विरोधकांना कायमचं घरी बसवण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा शिंदे यांनी केला. आमच्या योजनांमुळे विरोधकांना कुठेच काही संधी दिसेना, म्हणून त्यांनी योजनांची बदनामी सुरू केली. आमच्या योजनांची चौकशी लावू, दोषी आहे त्यांना तुरुंगात धाडू अशी भाषा त्यांनी सुरू केली; परंतु बाळासाहेबांच्या विचाराने तयार झालेला हा एकनाथ शिंदे तुमच्या पोकळ धमक्यांना भीत नाही, असा इशारा देऊन शिंदे म्हणाले की, तुम्ही मला हलक्यात घेतले. त्यामुळे तुमचा टांगा पलटी घोडे फरार झाले आणि तुम्ही ठरवले, तरी शेतकरी, लाडकी बहीण, लाडके ज्येष्ठ अशांसाठी मी केव्हाही तुरुंगात जायला तयार आहे. विरोधक दुतोंडी साप असून त्यांना आता या लाडक्या बहिणी वीस तारखेला कडकलक्ष्मी होऊन विरोधकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.
सरकारमध्ये पैसे खाणारे जेलमध्ये - काँग्रेसने कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांमध्ये घोषणा केल्या; परंतु त्या घोषणा पूर्ण करण्यासाठी आता त्यांच्याकडे पैसेच नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे भीक मागत सुटले आहेत, अशी टीका करून खटाखट पैसे देणारे आता कोठे आहेत, असा सवाल शिंदे यांनी केला. आम्ही मात्र लाडक्या बहिणींना फटाफट पैसे दिले, असं त्यांनी सांगितलं. यापूर्वी सरकारमध्ये असताना ज्यांनी पैसे घेतले, ते जेलमध्ये गेले. आम्ही मात्र लोकांच्या हप्त्याचे पैसे भरणारे आहोत, पैसे देणारे आहोत, पैसे घेणारे नाहीत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
तुलनात्मक कामाचा हिशेब देण्याचे आव्हान - महायुतीच्या संकल्पनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ, जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणे, बेरोजगार भत्ता, प्रशिक्षण भत्ता, दहा लाख युवकांना रोजगार, ४५ हजार गावात पाणंद रस्ते, अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये, वीज बिलात तीस टक्के सवलत आणि राज्यात कुठूनही कुठे सहा सहा तासात पोहोचता येईल, अशी दळणवळण व्यवस्था करणार असल्याचं सांगून २०२९ पर्यंतचा आराखडा आम्ही तयार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या अडीच वर्षातील महायुतीच्या कामाचा आणि त्यापूर्वीच्या अडीच वर्षातील महाविकास आघाडीच्या कामाचं तुलनात्मक रिपोर्ट कार्ड सादर करण्याचं आव्हान त्यांनी दिलं.
सिंग यांच्या काळात दोन लाख, मोदींच्या काळात दहा लाख - ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, त्यांची हिंमतच नाही, घरी बसून राज्य चालवता येत नाही. त्यांचा नुसता जळफळाट झाला आहे, कर नाही तर डर कशाला? मला किती शिव्या दिल्या, तरी जनता जनार्दनाच्या आशीर्वादामुळे माझे काहीच होऊ शकत नाही. अहंकाराने राज्य चालवता येत नाही. डॉ. मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षांच्या काळात दोन लाख कोटी रुपये मिळाले, तर मोदी यांच्या काळात राज्याला दहा लाख कोटी रुपये मिळाले, असं शिंदे यांनी निदर्शनास आणलं.
गरम पाण्याने पोट भरत नाही - लहान मुलासारखे आमच्यावर चिन्ह पळवले, आमदार पळवले अशी टीका करणारे त्यावेळी झोपले होते, का असा आरोप करून शिंदे म्हणाले की, लोकशाहीत बहुमताचा विजय होतो. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले. सत्तेसाठी विश्वासघात केला. शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली, ती शिवसेना एकनाथ शिंदे यांनी सोडवून आणली. विकासाच्या तुमच्या बाबतीत तुमचा ठणठणाट होता. तुम्ही काय केले, ते मात्र सांगत नाहीत. कोविडच्या काळात नुसतेच घरात बसला होता. लोकांना गरम पाणी प्यायला सांगून त्यांचे पोट भरत नसते. आम्ही मात्र सर्व सण आनंदोत्सव खुले केले आणि कोविड पळवला, असं शिंदे यांनी सांगितलं.
वनगा यांचे पुनर्वसन करणार - आमदार श्रीनिवास वनगा यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द शिंदे यांनी दिला. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी काही खासदारांना आपण थांबायला सांगितलं आणि त्यांना विधान परिषदेत आमदार केलं. त्याचप्रमाणे श्रीनिवास वनगा यांचंही आपण पुनर्वसन करू. उमेदवारी न दिल्यामुळे त्यांना राग येणं स्वाभाविक आहे. त्यामुळे ते नाराज झाले होते; परंतु आता ते राजेंद्र गावित यांच्यासोबत असून गेल्यावेळी वनगा यांना मिळालेल्या मताधिक्याच्या दुप्पट मताधिक्य गावित यांना मिळेल, असं ते म्हणाले. महायुतीच्या मतांबरोबरच गावित यांनी स्वतःची वैयक्तिक मतपेढी तयार केली आहे. ते कोणत्याही पक्षातून उभे असले, तरी आमदार, खासदार मंत्री होतात. त्यांनी लोक जोडले आहेत. त्यामुळे त्यांचा विजय नक्की आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा..