अहमदनगर - अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी जयंती सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील एका कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची उपस्थिती आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही चौंडीत होणार आहे. मात्र पोलिसांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना रोखले. यामुळे रस्त्यावरच समर्थक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
शरद पवारांची सभा होणार असल्याने पोलिसांनी संघर्ष टाळण्यासाठी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा ताफा चौंडीच्या वेशीवर रोखला. यामुळे गोपीचंद पडळकरांचे समर्थक संतापले. त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. आम्हाला आडकाठी कशासाठी केली असं गोपीचंद पडळकर सांगितलं. हा राजकीय कार्यक्रम नाही, कुणीही त्याला उपस्थित राहू शकते, असेही ते म्हणाले. याआधी रोहित पवारांना आणि त्यांच्या आजोबांना चौंडी का दिसली नाही? जयंतीला का आला नाहीत? का दर्शनासाठी येथे आला नाहीत? आता तुम्हाला राजकारण करायचं आहे आणि आमचं ऊर्जास्थान तयार झालेल्या चौंडी येथे तुम्हाला हल्ला करायचा आहे. आमचा इतिहास तुम्हाला बुजवायचा आहे, बहुजनांचे लचके तोडायचे आहेत म्हणून हा घाट घालता. शरद पवार आणि त्यांच्या नातवाने कार्यक्रमाला गालबोट का लावलं आहे? अशी प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी सुरू केली.
दरम्यान शरद पवारांच्या उपस्थितीत चौंडीमध्ये कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला पवार यांच्यासह रोहित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.