अहमदनगर - लोकसभेच्या उमेदवारीबाबत आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांच्या भूमिका जाणून घेण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज अहमदनगरला आले होते. या बैठकीत डॉ. सूजय विखे यांच्या उमेदवारीबाबत देखील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
यावेळी विद्यमान खासदार दिलीप गांधी बैठकीला उशिरा आले होते. बैठक संपल्यानंतर गिरीश महाजन विश्रामगृहामधून बाहेर पडत असताना गांधी समर्थकांनी 'दिलीप गांधी आगे बढो' अशा घोषणा देत नाराजी व्यक्त केली. याबाबत गांधी यांनाच विचारले असता, टीव्हीवाले एकच कॅसेट वाजवत आहेत, त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली आहेत, असे दिलीप गांधी म्हणाले.मात्र, यावेळी गांधी यांच्या चेहऱ्यावर गंभीरता जाणवत होती. गांधी यांना पक्षाने यापूर्वीही एकदा तत्कालीन विद्यमान खासदार असताना उमेदवारी नाकारून दिवंगत नारायण फरांदे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे सूजय विखे गळाला लागले तर गांधी यांचा पत्ता कट होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महाजन यांचे सूचक मौन
लोकसभेच्या उमेदवारी बाबत आमदार आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी आलो होतो, असे सांगत महाजन यांनी जास्त बोलणे टाळले. खासदार गांधी नाराज असल्याचेही त्यांनी नाकारले. तर डॉ. सूजय विखे यांच्या उमेदवारीवरही मौन बाळगले.