सातारा - खटाव तालुक्यातील वडूज येथील चित्रकार संजय कांबळे यांची आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाने वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन मुंबईत नवीन पॅनेलची निवड केली.
संस्थेचा वारसा जपण्यासाठी वचनबद्ध - संजय वसंत कांबळे हे वडूज (ता. खटाव ) येथील चित्रकार आहेत. नऊ सदस्यांच्या टीमचं नेतृत्व करत आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचा वारसा पुढे सुरू ठेवण्यासाठी ते वचनबद्ध आहेत. आर्ट सोसायटी ऑफ इंडिया ही एक प्रतिष्ठित संस्था असून या संस्थेनं 106 वर्षांपासून व्हिज्युअल कलाकारांना पाठिंबा दिला आहे.
'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर काम करणारी संस्था - आर्ट सोसायटी ऑफ इंडिया ही 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर कार्यरत असणारी संस्था आहे. जी व्हिज्युअल आर्ट्सची सार्वजनिक समज आणि प्रशंसा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते. तसंच कला प्रदर्शन, सार्वजनिक व्याख्याने आणि लहान मुलं तसंच तरुणांसाठी शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करते.
दिग्दर्शक, स्वतंत्र चित्रकार म्हणून यशस्वी कारकीर्द - चित्रकार संजय कांबळे हे सध्या मुंबईत कार्यरत आहेत. त्यांनी अनेक दशके परदेशात बहुराष्ट्रीय जाहिरात एजन्सीमध्ये काम करत कला दिग्दर्शक आणि स्वतंत्र चित्रकार म्हणून विशिष्ट कारकीर्द केली आहे. सध्या, ते त्यांच्या मुंबईस्थित स्टुडिओमध्ये पोर्ट्रेट आणि लँडस्केपवर काम करत आहेत. कांबळे यांना त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यात महाराष्ट्र शासनासोबत काम केल्याबद्दल पुरस्कारांचाही समावेश आहे.
प्रतिष्ठीत पुरस्कारांनी गौरव - संजय कांबळे यांना लोकराज्य मासिकाच्या मुखपृष्ठाची रचना, मुखपृष्ठ डिझाइनसाठी प्रतिष्ठित पॅमेक्स (आंतरराष्ट्रीय पुरस्कार), वॉटर कलर पोर्ट्रेटसाठी इंटरनॅशनल वॉटरकलर सोसायटीचे प्रथम पारितोषिक, छायाचित्रण पोर्ट्रेटसाठी निकॉन इंटरनॅशनल येथे प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आलं आहे. आघाडीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये त्यांची व्यंगचित्रे, कॉमिक्स आणि कॉमिक स्ट्रिप्स प्रसिद्ध झाली आहेत. सध्या ते ओडिशा राज्य संग्रहालयासाठी कलाकृती तयार करण्यात व्यग्र आहेत. जहांगीर आर्ट गॅलरी आणि अनेक आंतरराष्ट्रीय गॅलरीत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन झाले आहे.
आईच्या प्रेरणेने निर्माण झाली कलेची आवड - संजय कांबळे यांच्या आई एक प्रतिभावान कलाकार होत्या. आईच्या प्रेरणेनेच त्यांना कलेची आवड निर्माण झाली. त्यांच्या आईने गौरी पूजेसाठी अनेक संकल्पना दृश्ये तयार केली होती. आज संजय कांबळे हे व्हिज्युअल आर्ट अधिक सुलभ बनवण्यासाठी, कला विद्यार्थी, कलाप्रेमी आणि सामान्य लोकांमधील दरी नवनवीन कल्पना आणि उपक्रमांद्वारे भरून काढण्यासाठी कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया संजय कांबळे यांनी दिली.
हेही वाचा...