अहमदनगर (श्रीरामपूर) - श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील शेलार यांच्या घरातील गॅसचा सिलिंडरचा स्फोट झाला. ही घटना सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत याच घरातील शेलार दाम्पत्यासह एकूण चौघे गंभीर जखमी झाले ( Four Injured in Gas Cylinder Blast ) आहेत. त्यांच्यावर प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गॅस सिलिंडरचा स्फोट कसा झाला, याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही.
शशिकांत अशोक शेलार (वय 43 वर्षे), ज्योती शशिकांत शेलार (वय 38 वर्षे), यश शशिकांत शेलार (वय 16 वर्षे) व नमश्री शशिकांत शेलार (वय 8 वर्षे), अशी जखमींची नावे आहेत. शशिकांत शेलार यांचा औषधांचा व्यवसाय आहे. आज (दि. 6 जानेवारी) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ज्योती शेलार यांनी गॅसची शेगडी पेटवली असता भयानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिक हदरले. शेलार यांच्या घरावरील पत्रेही उडले. घरातील साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत चौघांनाही साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
घटनेची माहीती मिळताच अपर पोलीस अधिकारी दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप, बेलापूर येथील पोलीस कर्मचारी तसेच एटीएस पथक, तलाठी व मंडलाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. गॅस गळतीमुळे घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला तरी सर्व शक्यता ते पडताळून पाहत आहेत.
हेही वाचा - अहमदनगर : विद्यार्थिनीने मनमाड मार्गावरील पुलावरून गोदावरी नदीत मारली उडी, शोध सुरू