अहमदनगर - कर्जत तालुक्यातील भोसे शिवारात मंगळवारी सकाळी एक बिबट्या विहिरीत पडला. मात्र, विहिरीत पाण्याने तळ गाठलेला होता. त्यामुळे तो त्या ठिकाणी सुरक्षित होता. नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी पोलीस पथक व वन विभाग कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले.
परिसरामध्ये बिबट्या वावरत असल्याची शंका नागरिकांना होती व त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. मात्र, आज सकाळच्या सुमारास शेतकरी गुलाब भोसे त्यांच्या जेव्हा शेतावर गेले तेव्हा विहिरीमध्ये बिबट्या आढळल्याचे पाहिले व त्यांनी वनविभागाला कळवले. बिबट्याला विहिरीतून काढण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी बराच काळ प्रयत्न करत होते. सायंकाळी त्याला सुरक्षित बाहेर काढून पिंजऱ्यात जेरबंद करणात आले. बिबट्या सुरक्षितपणे पिंजऱ्यात अडकल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.