शिर्डी - आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान झालेल्या श्रीरामपूर येथील सभेच्या आयोजकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावर मंडप टाकून झालेल्या सभेला कोणतीही परवानगी घेतली नसल्याने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
आदित्य ठाकरे यांची पाचोरा येथून सुरू झालेली जन आशीर्वाद यात्रा सोमवारी अहमदनगर जिल्ह्यात पोहचली होती. अनेक ठिकाणी सभेचे आयोजनही करण्यात आले होते. सोमवारी दुपारी श्रीरामपूर शहरातील मेन रोडवरच मोठा मंडप घालून आदित्य ठाकरे यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या दरम्यान मेन रोडवरची वाहतूक बंद करावी लागली होती. आज या सभेचे आयोजक शहरप्रमुख निखिल पवार तसेच मंडप व्यवसायिक रणजित शेळके यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आणि नगरपालिकेची परवानगी न घेता रस्त्यावर मंडप टाकून नागरिकांना अडचण निर्माण करणाऱया सभेच्या आयोजकांवर आणि मंडप व्यावसायिकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यावर रविवारपासून मंडप टाकण्याचे काम सुरू असताना पोलिसांनी त्यावेळीच का अटकाव केला नाही? पोलिसांचा मोठा फौजफाटा, वरिष्ठ अधिकारी बंदोबस्तात असताना अगोदर कारवाई का केली नाही हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.