मुंबई : बुधवारी गेट वे ते एलिफंटा दरम्यान फेरीबोटीच्या दुर्दैवी अपघातात 14 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर महाराष्ट्र सागरी मंडळानं (महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड) जल प्रवासासाठी जीवरक्षक जॅकेट परिधान करण्याची सक्ती करण्याचा विचार सुरु केला आहे. या अपघातानंतर जल प्रवासासाठी अधिक कडक नियम लागू करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळानं पावलं उचलली आहेत. एलिफंटा दुर्दैवी अपघातानंतर महाराष्ट्र सागरी मंडळानं असे अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यास प्रारंभ केला. त्याबाबत महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन प्रवीण खरा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना माहिती दिली.
बचाव करण्यासाठी मिळत नाही जास्त वेळ :"जल प्रवासात अपघात झाल्यानंतर जीव वाचवण्यासाठी आणि बचाव करण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. त्यामुळे जल प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना जीवरक्षक जॅकेट परिधान करण्याची सक्ती करण्याबाबत मंडळ लवकरच निर्णय घेणार आहे. आतापर्यंत केवळ जल प्रवास करताना संबंधित बोटीमध्ये जीवरक्षक जॅकेट ठेवण्याबाबत निर्णय होता. मात्र, आता हे जॅकेट परिधान करुनच प्रवास करण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. परवाना देताना यापुढं लाईफ जॅकेट सक्तीच्या मुद्द्याचा त्यामध्ये अंतर्भाव केला जाईल," असं त्यांनी यावेळी सांगितलं.
110 फेरीबोटीच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक : "सध्या गेट वे ऑफ इंडिया येथून मांडवा, एलिफंटासाठी बोट सेवा चालवली जाते. या ठिकाणी नोंदणीकृत 110 फेरीबोटीच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते. प्रवासी फेरीबोटीच्या नोंदणी प्रमाणपत्र, वार्षिक सेवा प्रमाणपत्र, वार्षिक प्रवासी परवाना आदींसाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड कार्यवाही करते. तर, केवळ बंदर परवाना आणि तिकीट दरपत्रक बीपीटीकडून निश्चित करण्यात येते," असंही ते म्हणाले.
फेरीबोटीला कमाल आयुष्य नाही :"सध्या फेरीबोट (व्हेसल) ला सेवेत राहण्याची कमाल वयोमर्यादा नाही. मात्र मेरीटाईम बोर्डाकडून त्यांची वार्षिक तपासणी केली जाते. बोटीची तपासणी केल्यावर त्यांना प्रमाणपत्र दिले जाते. राज्यात 31 मार्ग मेरीटाईम बोर्डाच्या द्वारे चालवले जातात. जलवाहतूक नियंत्रण करण्यासाठी व मार्ग निश्चित करण्यासाठी व्हेसल ट्रॅफिक मॉनिटरींग सिस्टीम (व्हीटीएमएस) वापरली जाते. फेरीबोटींसाठी चॅनेल (वेगळा मार्ग) ठरवून देण्यात आला आहे. मात्र बुधवारी झालेल्या अपघातात नौदलाची बोट त्या मार्गात येऊन धडकली, त्यामुळे अपघात झाला. या अपघातातील फेरीबोट निकामी झाल्यानं त्याचा परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ऑटोमेटिक नेव्हिगेशनच्या माध्यमातून जल प्रवासातील मार्गांवर वाहतूक केली जाते. त्यामध्ये बोटीचा वेग, पुढील संभाव्य हालचाली आणि धोका याबाबत मार्गदर्शन मिळते. मात्र स्पीड बोटीचा वेग जास्त असल्यानं त्यामध्ये हे नेव्हिगेशन फारसे उपयुक्त ठरत नाही."
दोषींवर कारवाई करा - मनसे नाविक सेनेची मागणी : नीलकमल फेरीबोट दुर्घटनेप्रकरणी दोषींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेनेने मेरीटाईम बोर्डाच्या सीईओंकडं केली आहे. मनसे नाविक सेनेचे अध्यक्ष अविनाश जाधव आणि सरचिटणीस शेखर जाधव यांनी सीईओची भेट घेऊन त्यांच्याकडं ही मागणी केली.
बीपीटी देखील अॅक्शन मोडवर : या अपघातानंतर मुंबई पोर्ट ट्रस्टनं देखील मार्गदर्शक उपाययोजना आखण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे. एमबीपीटीचे डेप्युटी कन्झर्व्हेटर कॅप्टन प्रविण कुमार सिंह यांनी याबाबत माहिती दिली. प्रवासी बोटीत आत जाताना आणि बाहेर पडताना प्रवाशांची गणना करावी. फेरीबोट प्रवासामध्ये लाईफ जॅकेट सक्ती करावी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, बोटीमध्ये आणि जेटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, आपात्कालिन परिस्थितीत कामी येण्यासाठी इमर्जन्सी कंट्रोल नंबर सर्वत्र दिसतील, अशा ठिकाणी लावावेत. प्रवाशांना सुरक्षिततेसंदर्भातील व्हिडिओ दाखवावेत, अशा मार्गदर्शक सूचना करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.
हेही वाचा :