शिर्डी (अहमदनगर) - राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील डाव्या कालव्याची आणि त्यावरील आढळा धरणावर बांधण्यात आलेल्या सेतू पुलाची पाहणी केली. मात्र या कार्यक्रमास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचे खासदार सदाशीव लोखंडे यांनी आक्षेप घेत मंत्र्यासह अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आजच्या कार्यक्रमासाठी खासदार असूनही लोखंडे यांना मात्र टाळण्यात आले आहे. दरम्यान गेल्याच महिन्यात राहता तालुक्यात खासदार सदाशिव लोखंडे हे ही कालव्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांनीही जमावबंदी आदेश मोडल्याचा गुन्हा दाखवल करण्यात आला होता. त्यामुळे खासदारांना एक न्याय आणि मंत्री अधिकाऱ्यांना एक न्याय का? असा सवालही लोखंडे यांनी उपस्थित केला आहे. थांबलेल्या कालव्यांची कामे सुरू करावीत, अशी मागणी खासदार लोखंडे यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र सध्या जमावबंदी लागू असल्याने कामे करता येत नाहीत असे सांगण्यात आले होते. मात्र आता मंत्र्यांचा हा कार्यक्रम कसा घेतला गेला, असा सवालही लोखंडे यांनी उपस्थित केला आहे.