अहमदनगर - गोदावरी उजवा कालव्यात सोडण्यात आलेल्या आवर्तनातून धनदांडग्या लोकांची शेततळे भरुन दिली, असा आरोप छावा क्रांतीवीर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे संघटनेने राहाता तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. गेल्या ५ दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांच्या उपोषणाला व्यापाऱ्यांचाही दुकाने बंद ठेऊन पाठिंबा
गोदावरी उजवा कालव्याचे पाणी आवर्तन 18 ऑगस्ट 2019 ला सोडण्यात आले होते. या आवर्तनादरम्यान उपअभियंता व शाखाधिकारी यांनी धनदांडग्या लोकांच्या शेतातील शेततळे भरून देऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय केला. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी समर्थकांसह राहाता तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
हेही वाचा - दुष्काळाची दाहकता असह्य झाल्याने शेतकऱ्याचे अन्नत्याग आंदोलन
गोदावरी उजवा कालव्याच्या 60 मैल 20 चारी दरम्यान पाण्याच्या वाटपात मोठा घोटाळा झाल्याचेही वाघ यांनी म्हटले. ते म्हणाले, अधिकारी आणि कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने केली होती. मात्र, त्याची कुठलीही दखल न घेतल्यामुळे 2 सप्टेंबरला आम्ही हे उपोषण सुरू केले. संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही अथवा कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.