अहमदनगर - सततची नापिकी कर्जबाजारीपणा यामुळे शेवगाव तालुक्यातील शिंगोरीच्या शेतकऱ्याची विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंकुश मारुती चेमटे (वय ३२) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्याच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
अंकुश चेमटे हे काही दिवसांपूर्वी त्यांच्या एकत्रीत कुटुंबापासुन वेगळे राहत होते. त्यांच्या बंधुंनी त्यांना घरातुन वेगळे राहण्यास भाग पाडले, तेव्हांपासून ते ताणतणावत होते. दोन मुली लग्नाला आल्याने त्यांचे लग्न कसे करावे, हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. मुलांचे शिक्षण यामुळे ते व्यथित होते. घरच्यांनी साथ सोडल्यामुळे नैराश्य आल्याने नाइलाजाने त्यांनी आत्महत्या करुन आपले जीवन संपवले असावे अशी शक्यता कुटुंबियाकडून व्यक्त केली जात आहे. अंकुश चेमटे हे मितभाषी मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समजताच कुटुंबासह नातेवाईक व गावात हळहळ व्यक्त होत आहे. सरकारकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत जेणेकरुन शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबेल. प्रशासनाने अंकुश चेमटे यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देउन मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करण्याची भावना शिंगोरी गावातील नागरिक करत आहेत.