अहमदनगर - वाढदिवस म्हटले की मोठमोठे केक, गाजावाजा, फटाक्यांची आतषबाजी आणि जंगी पार्टी असेच चित्र डोळ्यासमोर येते. मात्र, कोपरगाव तालुक्यातील मंजूर गावातील एका शेतकऱ्याने नुकतेच आपल्या मुलीचा वाढदिवस शेतात उत्पादित केलेल्या फळांपासून अनोखा केक तयार करून अत्यंत साध्या पध्दतीने साजरा केला आहे. विशेष म्हणजे विविध प्रकारची फळे रचून केक तयार करण्यात आला होता. तो कापून उपस्थितांना वाटप करण्यात आला.
शेतात पिकवलेल्या फळांचा केक
कोपरगाव तालुक्यातील मंजूर गावातील शेतकरी लक्ष्मण बबनराव राजे भोसले यांची मुलगी तनुष्काचा हिचा काल (मंगळवार) वाढदिवस होता. यानिमित्ताने लक्ष्मण राजे भोसले यांनी एक अनोखी संकल्पना मांडली. बाजारातील केक घेण्यापेक्षा त्यांनी आपल्या शेतात पिकवलेल्या फळांचा केक तयार केला. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळांचा उठाव व्हावा या हेतूने त्यांनी हा प्रयत्न केला.
हेही वाचा- ....अन् वडिलांच्या अस्थीतून तिने साकारला 'टॅटू'
फळांचा उठाव होण्यासाठी ही संकल्पना
शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या फळांचा उठाव व्हावा आणि बाजारात फळांना योग्य भाव मिळावा यासाठी मी माझ्या मुलीचा वाढदिवस फळांचा केक कापून केला असल्याचे मत बबनराव यांनी व्यक्त केले. बाजारातील केक आणण्यापेक्षा फळांचा केक कापून लहान मुलांना व इतरांना त्याचे वाटप केले तर नक्कीच आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले राहील. आज समाजामध्ये वाढदिवस साजरा करताना तरुण पिढी एकमेकांच्या तोंडाला केक लावून अन्न वाया घालवत आहेत. त्यामुळे फळांचे केक ठेवल्यास असे प्रकार थांबण्यास मदत होईल. तर भेटवस्तू देतानादेखील कॅडबरीपेक्षा फळे दिली तर आरोग्याच्या दृष्टीने उत्तम राहील असेही भोसले म्हणाले.
तर शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर भेटेल
केक ऐवजी कलिंगड कापा खरबूज कापा, सफरचंद, पेरू, पपई, सीताफळ, आंबा, या फळांचा वाढदिवसाच्या निमित्ताने केक सारखाच वापर करा. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला बाजार वाढेल. जर शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर आपल्या वाढदिवसानिमित्ताने एकाच शेतकऱ्याचे फळ खरेदी करून त्याला मदत करावी. हा विचार आपल्या कृतीतून उतरवला तर शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर भेटेल.
हेही वाचा- कोल्हापूरच्या लेकीचा दिल्लीत डंका, नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत पटकावले रौप्य पदक